महाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

PM किसान व विमा योजनांचे पैसे हडपणाऱ्या सर्वच बोगस शेतकऱ्यांकडून वसुली सुरू – कृषिमंत्री धनंजय मुंडे

पोकरा योजना प्रत्येक गावात राबविणार

मुंबई दि. २५ : ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. नियम 260 अन्वये उपस्थित चर्चेच्या उत्तरात मंत्री श्री. मुंडे बोलत होते.

“राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिकविमा भरला असून, ही संख्या दररोज 6 ते 7 लाखांनी वाढत आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीकविमा योजना अधिक सोयीची झाल्याचे स्पष्ट होते,” असे मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळत आहे तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार मिळून वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असेही मंत्री श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

PM किसान व विमा योजनांचे पैसे हडपणाऱ्या सर्वच बोगस शेतकऱ्यांकडून वसुली सुरू

विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेत्यांसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री श्री. मुंडे यांनी पीएम किसान सन्मान योजनेतून बोगस पद्धतीने पैसे हडपलेल्या सर्वच बोगस शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने वसुली सुरू केली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान, सदस्यांनी उपस्थित केलेल्या पीक कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या उर्वरित लाभाबाबत बोलताना मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, पुरवणी मागण्यांमधून या रकमेची तरतूद करण्यात आली असून, 15 ऑगस्टपर्यंत या रकमा वितरित केल्या जातील.

बोगस बियाण्यांच्या तक्रारींबाबत घोषित केल्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू असून, कालच मंत्रिमंडळ उपसमितीची यासंदर्भात बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी 5 हजार गावांचा समावेश करण्यात येत असून, जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपावे, यादृष्टीने वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button