काही ‘लाडक्या बहीणींच्या खात्यात आधी १ रू येणार ! मराठी भाषेतील अर्ज रद्द होणार का ? आता नवीन पोर्टल सुरू, वाचा सविस्तर
नवीन वेबसाईट वरून अर्ज भरणे सोपं
मुंबई ,दि-१ ऑगस्ट, ‘मुख्यमुंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ‘ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या
योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही
पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्माननिधीचा
लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना केलेलं आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या
खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक
तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात सुरवातीला प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानुंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रकियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज अथवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे.
नवीन संकेतस्थळ (पोर्टल) लॉन्च
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत विविध सायबर कॅफे आणि ॲपद्वारे काही ठिकाणी तांत्रिक अडचण येत असल्याने शासनाने आज ही प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी खालील https://ladakibahin.maharashtra.gov.in/?s=08 हे नवीन संकेतस्थळ आजपासून सुरू केलेलं असून यावरून सुद्धा आता या योजनेचे अर्ज भरता येणार आहे. या योजनेच्या अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.
मराठी भाषेतील अर्ज रद्द होणार का ?
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.