गिरीश महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम,त्यात त्यांचं प्राविण्य-विजय वडेट्टीवार
गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस
नाशिक,दि-१७ मे, काही दिवसांपूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीतून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे.अगदी खूप ताणाताण करूनही उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे बोलले जात होते. छगन भुजबळ हे बरेच प्रचारात देखील सहभागी होत नव्हते. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी याआधीदेखील छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर छगन भुजबळ गोडसेंच्या प्रचारात सहभागी झाले होते. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे समजले, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे.
गिरीश महाजनांकडे लोण्याचं मडकं
यानंतर आज भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये फार्महाऊसवर भेट घेतलेली आहे. महाजन-भुजबळ भेटीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, गिरीश महाजनांचे हे कामच आहे. त्यांच्याकडे दूध, दही आणि लोणी यांचं खूप भंडार आहे. ज्यांना जिथे गरज पडली ते तिथे लोण्याची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन दरवाजात पोहोचतात. जेवढी लोणी लावता येतील तेवढी लावायची आणि त्यांची नाराजी दूर करायची इतकेच काम त्यांच्याकडे आहे. लोण्याने भरलेले कुंभासारखे मडके त्यांच्याकडे आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार त्यांनी यावेळी केली आहे. वडेट्टीवार यांच्या या मिश्किल वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.