Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

जळगावात RTO कार्यालयात डमी ग्राहक आणि बनावट NOC वापरून बेकायदेशीरपणे स्कार्पिओ वाहन हस्तांतरणाचा प्रकार उघडकीस

संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता ?

जळगाव, दि-05/02/2026,  प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बनावट कागदपत्रांच्या आधारे स्कॉर्पिओ वाहनाचे बेकायदेशीर हस्तांतरण करून शासनाची तसेच मूळ वाहन मालकाची मोठी फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील वाहनाच्या मूळ मालकांना हा व्यवहार होईपर्यंत कोणतीच कल्पना नव्हती. तसेच सदरील चारचाकी वाहनाचे 17 लाखांचे बँकेचे कर्ज थकबाकी असल्याचे मूळ मालक यांनी सांगितले आहे.
फिर्यादी दीपक शिवाजीराव ठाकरे (वय ४६, रा. नवनाथ नगर, जळगाव) यांच्या मालकीचे वाहन क्रमांक MH-19-EJ-8055 हे आहे. संशयित आरोपींनी या वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने फसवणूक केली. त्यांनी प्रथम वाहन मालकाचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. त्यानंतर आरटीओ कार्यालयासमोर एका ‘डमी’ व्यक्तीला उभी करून तीच मूळ मालक असल्याचे भासवले. या डमी व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेऊन वरिष्ठ लिपिकांकडून त्या साक्षांकित करून घेतल्या आणि वाहनाचे परस्पर हस्तांतरण पूर्ण केले.
याशिवाय, आरटीओच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आणि बनावट ‘बँक ना-हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate) तयार करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. या फसवणुकीमुळे मूळ मालकाची मालमत्ता हस्तांतरित झाली आणि त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून शिवलाल ब्रिजलाल पाटील (रा. मुक्ताईनगर), अक्षय सोनवणे (रा. जळगाव) आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात फर्स्ट इनफॉर्मेशन रिपोर्ट (FIR) क्रमांक २९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि डमी व्यक्तीचा वापर करणारे इतर आरोपी असल्यास त्यांचाही शोध घेतला जात आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनीही या प्रकाराबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अशा फसवणुकीला आळा बसावा.
या घटनेमुळे आरटीओ कार्यालयातील कागदपत्र तपासणी प्रक्रिया आणि ऑनलाइन सिस्टमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपास अधिक खोलवर सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button