नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश रुपेश राठी तातडीने निलंबित, हायकोर्टाच्या समितीने हजर होताच केली मोठी कारवाई

नाशिक दि-११/०४/२५, नाशिकमध्ये कार्यरत जिल्हा न्यायाधीश यांना ११ एप्रिल रोजी अचानक पदमुक्त करण्यात आले. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे पथक नाशिकला दाखल झाले होते. त्यांनी ही कारवाई केली असून या कारवाईमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दि.11 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाजादरम्यान एक खळबळजनक निर्णय झाला. मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी घेतलेल्या या निर्णयाने जिल्हा न्यायालयात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जिल्हा न्यायाधीश (सहावे) रुपेश राठी हे सकाळी दहा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित झाले व त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी निरोप पाठवून बोलवून घेतले आणि त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश रुपेश राठी यांच्या काही न्यायालयीन निवाड्यांबाबत उच्च न्यायालयात तक्रारी दाखल झालेल्या होत्या. जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या निकालांचा गोषवारा आणि पडताळणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करीत असतात. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींचेही अवलोकन केले जाते. जिल्हा न्यायाधीश राठी यांच्या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी याबाबतची कार्यवाही झाली होती. नियमित प्रक्रियेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या पथकाने न्यायाधीश राठी यांच्याबाबत चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जिल्हा न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचे पत्र पाठविले होते. त्यानुसार सदर कार्यवाही झाली आहे.