भुसावळात तहसील प्रशासनाची धडक कारवाई : 19 हॉटेल्सवर छापे, 12 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

भुसावळ – शहरात हॉटेल, ढाबे व इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाने आज अचानक छापे टाकत 19 आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान एकूण 12 घरगुती (अनुदानित) गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

हॉटेल गोपाळ – 4 सिलिंडर
गुरुकृपा भरीत सेंटर – 2 सिलिंडर
डंबेलकर चहा सेंटर – 1 सिलिंडर
सुहास हॉटेल – 2 सिलिंडर
हॉटेल युवा प्रतिष्ठान – 2 सिलिंडर
तवक्कल हॉटेल – 1 सिलिंडर
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, घरगुती वापरासाठी देण्यात येणारे अनुदानित गॅस सिलिंडर केवळ घरगुती स्वयंपाकासाठीच वापरणे बंधनकारक आहे. त्याचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो.

तहसील प्रशासनाने सर्व हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांना कडक इशारा देत सांगितले आहे की, त्यांनी केवळ व्यावसायिक (निळ्या रंगाचे) गॅस सिलिंडरच वापरावेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.
यापुढेही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनीही कुठे घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्यास तात्काळ पुरवठा विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













