
मुंबई, दि- 14/08/2024, संपूर्ण राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या महिनाभरापासून ई पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहिलेले आहे. या तांत्रिक अडचणी लवकर दूर होण्याची शक्यता नसल्याने आता नागरिक संतापलेले आहेत. त्यामुळे ते धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहे. ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यांकरिता अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिलेल्या आहेत.