Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

चिंचोली सब-स्टेशनमधील इलेक्ट्रिक पोल चोरी प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्याच्या निषेधार्थ जळगावात एक दिवसीय लक्षणीय उपोषण

सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया देणार भेट

जळगाव -,दि-23/01/2026, जिल्ह्यातील चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत सब-स्टेशनवरून इलेक्ट्रिक पोल चोरीच्या प्रकरणात गुन्हा नोंदविला न गेल्याच्या संतापातून ठेकेदार संजय रामभाऊ वराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उपोषण दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार असून, त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.  या आंदोलनाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाठिंबा दर्शविलेला असून त्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत.
संजय वराडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपी आत्माराम पुंडलिक पाटील याने स्वतः कबुली दिली आहे की त्याने चिंचोली येथील सब-स्टेशनवरून इलेक्ट्रिक पोल चोरले आहेत. तरीही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. यापूर्वीही या परिसरात एका वर्षात पाच वेळा तार चोरीच्या घटना घडल्या असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही न्यायालयात “पुरावा आढळत नाही” असा खोटा अहवाल सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वराडे यांनी पुढे म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर पूर्वी एमडी ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. पावसाळी अधिवेशनात आमदार चंद्रकांत पाटील, किशोरआप्पा पाटील आणि माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी विधानसभेत त्यांच्याविरोधात आवाज उठविला होता. राज्य गृहमंत्र्यांनीही ड्रग्स प्रकरणात संबंध असल्यास बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी दत्ता पोटे यांना निलंबित करण्यात आले, परंतु आव्हाड यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पदभार देण्यात आले, जे एक प्रकारे बक्षीस देण्यासारखे आहे, असे वराडे म्हणाले.
तसेच, इच्छावेवी चौक येथे गॅस रिफिलिंगच्या अवैध धंद्याला परवानगी दिल्यामुळे झालेल्या घटनेत सात जणांचा जीव गेल्याचा जबाबदारही आव्हाड यांना ठरवत, पोलीस प्रशासनाची बदनामी होत असल्याचे आणि सामान्य लोकांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आव्हाड यांच्या कारकीर्दीत अनेक गुन्हे, घातपात आणि अवैध धंदे जोरात चालू असून, त्यात त्यांची भागीदारी असल्याचा दावा वराडे यांनी केला आहे. साधे गुन्हेही नोंदविले जात नसल्याने आपल्या स्तरावरून गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वराडे यांनी स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या जिवास किंवा कुटुंबीयांच्या जिवास धोका पोहोचला तर त्याला पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे जबाबदार राहतील. त्यामुळे आव्हाड यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, उपोषणाची सूचना दिली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह गृहमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना माहितीस्तव पाठविले आहे.
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि स्थानिक गुन्हेगारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button