भुसावळात पहाटे पोलिसांचे धडक कोम्बिंग ऑपरेशन; तब्बल 99 जणांची चौकशी, गावठी कट्ट्यासह घातक शस्त्रांचा साठा हस्तगत
पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी क्षेत्रात पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेदरम्यान मोठ्या प्रमाणावर विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. मा. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २० अधिकारी, २०० पोलीस अंमलदार आणि ५ आरसीपी पथकांच्या सहभागातून ही व्यापक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, फरार आरोपी, संशयित व्यक्ती तसेच अवैध धंद्यांवर पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.
९९ आरोपींची पडताळणी, ६३ घरांची झडती
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये विविध गुन्ह्यांतील ९९ आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच ६३ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. यावेळी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. पोलिसांनी गुन्हेगारी हालचालींची माहिती संकलित करून पुढील प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
११२ वाहनांची तपासणी; २३ संशयित वाहने जप्त
शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग आणि बाहेरील मार्गांवर नाकाबंदी करून ११२ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेली किंवा संशयास्पद वाटणारी २३ वाहने जप्त करण्यात आली.
गावठी कट्टा, जिवंत काडतूस, तलवारी आणि कोयता जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवत १ गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस, २ तलवारी आणि १ कोयता जप्त केला. या प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
चोरीची दुचाकी हस्तगत
चोपडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ८४/२०२६ मधील चोरीस गेलेली एक दुचाकी या ऑपरेशनदरम्यान शोधून काढण्यात आली. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई
शहरालगत सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती केंद्रांवर पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीच्या तीन कारवाया केल्या. या कारवाईत सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन नष्ट करण्यात आले.
मध्यप्रदेशातील पाहिजे आरोपी ताब्यात
या मोहिमेदरम्यान खंडवा (मध्यप्रदेश) येथील जीआरपीचा एक पाहिजे आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कलम १४२ अंतर्गत कारवाई
हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे कायदा मोडणाऱ्या घटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
गुन्हेगारांविरोधातील मोहिमा आणखी तीव्र होणार
भुसावळ उपविभागात गेल्या काही महिन्यांत पोलिसांकडून सातत्याने कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन राबविले जात असून गुन्हेगार, फरार आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. यापूर्वीही अशाच कारवायांमध्ये शस्त्रे जप्त करणे, फरार आरोपींना अटक करणे आणि वाहन तपासणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध शस्त्रसाठा, दारू व्यवसाय किंवा गुन्हेगारी माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या धडक कारवाईमुळे भुसावळ शहर आणि परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा गुन्हेगारांविरोधातील धडाका आगामी काळातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.













