मुंबईच्या अटल सेतूवरून पहिली आत्महत्या ! टॅक्सी चालकाविरोधात आत्महत्येस सहकार्य केल्याचा गुन्हा दाखल
टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल
नवी मुंबई दि-२० मार्च, ‘‘मला अटलसेतू बघायचा आहे, तिथं फिरायचं आहे,’’ असं सांगून एका महिलेनं टॅक्सी केली. पुलावर येताच फोटो काढण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली आणि उतरून थेट समुद्रात उडी मारली. प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालकानं न्हावाशेवा पोलिसांना ही माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटल सेतू वरून एखाद्याने उडी मारून आत्महत्या केल्याची ही पहिली घटना समोर आलेली आहे.
सोमवारी घडलेल्या या घटनेतील किंजल कांतिलाल शाह (43, रा. दादर) या महिलेचा आता खोल समुद्रात शोध सुरू आहे.
शिवडी ते न्हावा शेवादरम्यान उभारलेल्या आणि अलीकडेच वाहतुकीसाठी सुरू झालेल्या अटल सेतूवरून एका डॉक्टर महिलेनं सोमवारी 18 मार्च रोजी उडी मारली होती. न्हावा शेवा पोलिसांनी कोस्टल पोलीस, तसंच मुंबई पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केलं आहे; मात्र अद्याप खोल महिलेचा शोध लागलेला नाही. किंजल यांचे वडील कांतिलाल यांनी दादरच्या भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला आणि किंजल बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली आणि तपास सुरू केला आहे.
न्हावा शेवा इथले वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोटे पाटील यांनी ‘मिडिया मेल’ न्यूजला सांगितलं की, ‘‘आम्ही कोस्टल पोलिस आणि अन्य स्थानिक ग्रामस्थ तसंच बचाव पथकांच्या मदतीनं महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण अद्याप ती महिला सापडलेली नाही. सोमवारीच आम्ही टॅक्सी चालकाचा जबाबही नोंदविला आहे. त्यानं जबाबबात सांगितलं आहे, की महिलेला अटल सेतू बघायचा होता, त्या ठिकाणी तिला फिरायचं होतं. त्यामुळे अटल सेतूवरून टॅक्सी न्यावी, असं तिनं त्याला सांगितलं होतं. आम्ही नातेवाईकांनादेखील जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. या घटनेचा तपास, शोधकार्य अजूनही सुरू आहे.’
टॅक्सी चालक गोत्यात
अटल सेतूवर गाडी थांबवून सेल्फी काढण्यावर सक्तीची बंदी आहे. टॅक्सी थांबवून ‘त्या’ महिलेला सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आत्महत्येस सहकार्य केल्याप्रकरणी त्या टॅक्सी चालकास पोलिसांनी टॅक्सीसह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.