पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे,माधव भंडारी प्रबळ दावेदार, तर महाविकास आघाडीत खळबळ

भाजप मागील धक्कातंत्राची पुनरावृत्ती करणार ?

मुंबई दि-29, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक  सोमवारी जाहीर केलेल असून येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातून विनोद तावडे, माधव भंडारी आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.पुण्यात गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण बहुल भागातून ब्राह्मण उमेदवारच पाहिजे असे पोस्टर अनेक ठिकाणी दिसले होते. त्यानंतरही भाजपने उमेदवार दिला नव्हता. मुळात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठेसारख्या भागात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडून आलेले होते. हा भाजपसाठी एक मोठा धक्का होता.इथला ब्राह्मण मतदार हा नाराज असल्याची चर्चा होती.त्यामुळे हा इतिहास बघता पुण्यातून भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तीन-चार वर्षाच्या कालखंडात प्रत्येक राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावाची चर्चा असते.ते पक्षाच्या कामात सक्रिय आहेत.
   आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेता भाजप राज्यसभेसाठी मराठा कार्ड वापरून शकते. तसेच एक मराठा व ब्राम्हण उमेदवार देणार असल्याचं समजतेय. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या डावपेचांमुळे बिहारमध्ये सत्तांतर होऊन भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी विनोद तावडेंचे नाव सर्वांत आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय  सूत्रांकडून मिळालेली आहे.याबाबत केंद्रीय नेतृत्व 10 फेब्रुवारी पर्यंत अंतिम निर्णय घेणार आहे. 
   राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदार मतदार असतात, मागील दोन वर्षांत राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यसभेचे खासदार निवडणूक देणारे आमदार इकडे तिकडे झालेले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. राज्यात सत्तेतील महायुतीत तीन प्रमुख पक्ष आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) यांच्याकडे एकूण 205 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यसभेवर एका जागेवर निवडून येण्यासाठी 48 आमदारांचे संख्याबळ लागते. भाजपचे 105 संख्याबळ लक्षात घेता त्यांचे दोन खासदार सहज निवडून येऊ शकतात. तसेच शिवसेना शिंदे गटाचा एक खासदारही निवडून येऊ शकतो. महायुतीचे संख्याबळ हे महाविकास आघाडीपेक्षा नक्कीच जास्त आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीला किमान पाच जागा मिळतील.

मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होणार ?

तसेच मागील राज्यसभेच्या निवडणुकीचा इतिहास लक्षात घेता संख्याबळ नसतानाही भाजपने संजय महाडिकांना धक्कातंत्र वापरून निवडून आणले होते. आताही भाजप सहाव्या जागेसाठी सुद्धा जोरदार प्रयत्न करू शकते व चमत्कारिकरित्या सहावी जागा सुद्धा निवडून आणू शकते. तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळू शकते. मात्र त्या जागेसाठी कांँग्रेस आग्रही आहे.याचे कारण त्यांचे सदस्य संख्याबळ 45 आहे.गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ ते दहा आमदारांनी क्राँस वोटिंग केल्याची घटना घडलेली होती. परंतु काँग्रेसने त्यांनतर कोणत्याही आमदारांवर कोणतीही कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. यामुळे उद्धव ठाकरे गटाचे  विद्यमान एकमेव खासदार अनिल देसाई यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. कारण त्यांचे संख्याबळ फक्त 14 आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणे अवघड दिसतेय. येणाऱ्या निवडणुकांसाठी ही निवडणूक भाजपसाठी संजीवनी ठरणार आहे तर महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची राहणार आहे. यातूनच आगामी निवडणुकांची फायदा तोट्याची समीकरणे बांधली जाऊ शकतात.
राज्यातील सध्याची स्थिती काय ?
महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यामध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचे आमदार आहेतच, त्याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांचीही ताकद असेल. त्यामुळे कोण किती उमेदवार देणार? याची राजकीय चर्चा सुरु आहे. सध्या असलेल्या पक्षनिहाय आमदारांच्या संख्येवरुन महाराष्ट्रतील सहा रिक्त जागापैकी महायुतीकडे पाच आणि महाविकासआघाडीचे एक जागा जाऊ शकते. 
महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त – 
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार ? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत धक्कातंत्र वापरून ऐनवेळेस नवखा चेहरा देण्याची सध्याची रणनीती पाहता लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार की नाही याचीच जास्त चर्चा सुरू आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button