सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही ‘सुपारी किलर’ अटकेत
मुंबई व गुजरात पोलिसांची संयुक्त कारवाई
मुंबई दि-16 एप्रिल, रविवारी पहाटे बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती.या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने दोन्ही आरोपींच्या गुजरातमधील भूज मधून मुसक्या आवळलेल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, त्या दोघांनाही चौकशीसाठी गुजरातमधून मुंबईत आणण्यात येत आहे. थोड्याच वेळात गुन्हे शाखेचे पथक आरोपींना घेऊन मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.
दोन्ही आरोपी सुपारी किलर ?
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी हे हायवेच्या दिशेने पळाले होते. एका रिक्षावाल्याला त्यांनी वेस्टर्न हायवेचा पत्ता विचारला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपींचा माग काढत होते. तसेच सायबर टीमकडून डंप डेटाही काढण्यात आला. दोन्ही आरोपी भुज येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याची पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर भुजच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली. कारण स्थानिक पोलिसांना न कळवताच मुंबई पोलिस आरोपींना पकडण्यासाठी गेले असते तर ते आरोपी सुपारी किलर असल्याने त्यांच्यावर गोळीबार होऊ शकतो, अशी शंका होती. त्यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेत गुजरातमधील भूजचे स्थानिक पोलीसांचे पथक सोबत घेतले. तर गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक भुजला पोहोचले. त्यानंतर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक करून मुसक्या आवळलेल्या आहेत.
शूटर्स सापडले पण पिस्तूल नाही
दरम्यान याप्रकरणी बॅलिस्टिक रिपोर्टसाठी गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल मिळणं महत्वाचं आहे. माता का मढ मंदिर परिसरात कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना तर अटक केली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सलमनाच्या घराबाहेर ज्या पिस्तूलातून गोळीबार केला, ती पिस्तुल काही पोलिसांना अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. आरोपींच्या झडतीत कोणतेही हत्यार सापडले नाही. चौकशीत आरोपी उघडपणे काही सांगत नाहीत. गोळीबारानंतर फरार होताना आरोपींनी हत्यार कुठेतरी लपवून ठेवल्याचा किंवा फेकून दिल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पिस्तूल शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांना जिवंत काडतूसही सापडले असून, बॅलेस्टिक अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.