हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, 91267 पाण्याचा विसर्ग सुरू

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि रात्री झालेल्या दमदार पावसामुळे आज दि-14/08/2020 रोजी सायंकाळी 6 वाजेला हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले असून त्यातून 91267 क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तापी नदी किनारी कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. तसेच आज धरणाची जलपातळी 209.620 मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी 182.60 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने अशा जादा वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने धरणात जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील 38 हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.