जळगावचे हुकले पण मुंबईचे भेटले, ॲड.उज्वल निकम यांना मिळाली भाजपची उमेदवारी
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना देणार टक्कर
मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टीत येणाऱ्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने आज तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार आशिष शेलार यांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने अनेकदा विचारणा केली होती. मात्र त्यांनी विधानसभेतच रस असून लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित झालं होतं. मात्र अनेक दिवसांपासून या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.या मतदारसंघात 45 टक्के दलीत मतदारांचे प्राबल्य आहे.
जळगावचे हुकले मुंबईचे भेटले मोठा काथ्याकूट केल्यानंतर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी ॲड उज्वल निकम यांचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत होते. मात्र ते मागे पडून त्यांचे पुतणे रोहित निकम यांचे नाव पुढे आले होते.मात्र तेही मागे पडून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे. उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. उज्ज्वल निकम हे जेष्ठ सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खैरलांजी हत्याकांड आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबविरुद्धच्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती.