Advertisement
अर्थकारणआरोग्यक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीयसंपादकीय

‘रात्रीस खेळ चाले’ ! मुक्ताईनगरचा तो ‘भाऊ’ कोण ? भुसावळजवळ वनअधिकाऱ्यांना धमकावून सोडवले राखचोरी करणारे जेसीबी; ४ ट्रॅक्टर जप्त, मात्र कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ

राखमाफियांवर मुक्ताईनगरच्या 'भाऊं'चा वरदहस्त !

भुसावळ : मयुरेश निंभोरे | दि-०९/०५/२०२६, भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुसरी-पिंपळगाव परिसरातील बंद राखेच्या बंडावर राखमाफियांनी मोठा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ७०० कोटी रुपयांच्या राखसाठ्यावर सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणात मुक्ताईनगरच्या एका प्रभावशाली ‘भाऊ’चा हस्तक्षेप झाल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. या तथाकथित भाऊंच्या वरदहस्तामुळेच राख माफियांवर कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी पहाटे वनविभागाच्या पेट्रोलिंग पथकाला चार ट्रॅक्टर व दोन जेसीबी राखेच्या बंडात उतरून अवैध उत्खनन करताना रंगेहाथ आढळून आले. संबंधित वाहनचालकांना पकडल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगरच्या एका ‘भाऊ’ला फोन लावून वनअधिकाऱ्यांशी थेट बोलणे करून दिले. फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना दबाव टाकण्यात आल्याची चर्चा असून, त्यानंतर दोन्ही जेसीबी व त्यावरील आठ ते दहा जण घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे बोलले जाते. हे जेसीबीचे प्रकरण दडपण्यासाठी केवळ चार ट्रॅक्टर जप्त करून मुक्ताईनगर वनविभागाच्या कार्यालयात उभे करण्यात आले, मात्र त्या वाहनांवर किंवा संबंधित राखमाफियांवर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली, याची माहिती एक महिना उलटूनही देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या संदर्भात माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता वनक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे या कार्यालयात उपलब्ध होत नसल्याचे अनेकदा दिसून येते. तसेच अनेक पत्रकारांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण कारवाई दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
२४ तास सुरक्षा असताना एवढी मोठी चोरी कशी?
सुसरी परिसरातील सुमारे १२० हेक्टर क्षेत्रफळावरील राखेचे हे बंड सन २००६ मध्ये पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बंद करण्यात आले होते. त्यावर चार फूट माती टाकून वृक्षारोपणही करण्यात आले होते. हा परिसर नंतर वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि येथे २४ तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.
मात्र, इतकी सुरक्षा व्यवस्था असताना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जेसीबी-पोकलेनच्या सहाय्याने उत्खनन होत राहिले आणि प्रशासनाला त्याची खबर लागली नाही, यामुळे वनविभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत दररोज १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे राखेची वाहतूक केली जाते. राखेचा अधिकृत दर सुमारे ३०० रुपये प्रतिटन असताना काळ्या बाजारात तीच राख ८०० ते १००० रुपये प्रतिटनाने विकली जात असल्याने हा संपूर्ण प्रकार मोठ्या आर्थिक रॅकेटचा भाग असल्याचा संशय आहे.
तो जेसीबी कोणाचा ? तो ‘भाऊ’ कोण ?
या कारवाईदरम्यान जप्त झालेल्या ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर वरणगावच्या एका माजी नगरसेवकाचा असल्याची चर्चा आहे, तर उर्वरित तीन ट्रॅक्टर मुक्ताईनगरच्या त्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांचे असल्याचे बोलले जात आहे. राख चोरीसाठी वापरण्यात आलेले दोन्ही जेसीबी नेमके कोणाचे होते आणि त्यांना सोडवण्यासाठी दबाव टाकणारा तो ‘भाऊ’ कोण, याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पर्यावरणीय हानी गंभीर
या अवैध उत्खननामुळे १८ वर्षांपूर्वी लावलेली शेकडो झाडे तोडण्यात आली असून, परिसरात तब्बल १५० फूट खोल खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली असून पर्यावरणीय संतुलनही धोक्यात आले आहे.
७०० कोटींचे नुकसान; चौकशीची मागणी
स्थानिकांच्या मते, या ठिकाणाहून सुमारे ७०० कोटी रुपयांच्या राखेची चोरी झाली आहे, तर काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हा आकडा हजारो कोटींपर्यंत जाऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर संबंधित वनअधिकारी, सुरक्षा रक्षक आणि संशयित राखमाफियांचे सीडीआर रेकॉर्ड तपासून सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ऊर्जामंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच राखसाठ्याचा पारदर्शक लिलाव करून शासनाचा महसूल वाचवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
भुसावळजवळील सुसरी राखेच्या बंडात सुरू असलेला हा ‘रात्रीचा खेळ’ नेमका कधी थांबणार आणि ‘त्या भाऊ’सह जबाबदारांवर कारवाई कधी होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp