“ओरीजनल खडसे” भाजपात ! राष्ट्रवादीच्या ” सिग्नल ” यंत्रणेत बिघाड झाल्याने, संतोष चौधरी आज ‘पत्ते’ खोलणार ?
जळगाव,दि-७ एप्रिल | Eknathkhadsebjp “ओरिजनल खडसे” आमच्यासोबत असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी केले होते.
एकनाथराव खडसे यांनी तब्येतीच्या कारणास्तव रावेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढील पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रावेर लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगून आपल्याला शरद पवार साहेबांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती चौधरींनी प्रसारमाध्यमांना दिलेली होती. मात्र त्यानंतर टंचाई जाणवत असताना तापी नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे.
शरदचंद्र पवार गटाने त्यांच्या हिश्यावर आलेल्या सर्व जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करून यादी जाहीर केलेली आहे.अपवाद मात्र रावेरच्या जागेचा बाकी राहिला आहे. संतोष चौधरींना उमेदवारीचा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर सुद्धा उमेदवारी मिळण्यासंदर्भात काहीही हालचाली होत नसल्याचे दिसून आलेलं आहे. या सर्व घडामोडींवरून संतोष चौधरींच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती दिलेली आहे. दुसरीकडे भाजपचे रावेर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतलेली आहे. अमोल जावळे हे भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. जावळे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आल्याने ते शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे संतोष चौधरींच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अजून वाढलेला आहे. त्यांना उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर डावलले जात असल्याने त्यांच्यावर घोर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यासह तर त्यांच्या समर्थकांच्या मनात रुजू झालेली आहे. अशी खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे.या सर्व घडामोडींमुळे संतोष चौधरींचे भुसावळ परिसरात असलेले खंदे समर्थक सुद्धा नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रावेर लोकसभा निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी संतोषभाऊ चौधरी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू अनिलभाऊ चौधरी हे सुद्धा खांद्याला खांद लावून मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. आज शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहणार असून त्यानंतरच आज सायंकाळी संतोषभाऊ चौधरी हे आपले ” पत्ते ” ओपन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ते आज कोणता निर्णय घेणार ? काय घोषणा करतात ? याकडे त्यांच्या समर्थकांसह रावेर लोकसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून आहे.