जळगाव शिक्षक भरती घोटाळ्यात नाशिकरोड पोलिस निरीक्षक अशोक गिरी निलंबित; पुराव्यांशी छेडछाडीचा गंभीर आरोप, एसआयटी चौकशीत निष्पन्न

नाशिक/जळगाव, दि. २९ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाला हादरवणाऱ्या बनावट शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात नवीन वळण आले आहे. जळगाव जिल्ह्यातील या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल नाशिक रोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना शासनाने निलंबित केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या राज्यस्तरीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) अशोक गिरी यांच्यावरील पुरावे गोळा केले असून, त्यांच्या संगनमताने घोटाळ्यातील कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे नाशिक शिक्षण विभागातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची लाट उसळण्याची शक्यता बळावली आहे.
घोटाळ्याची पार्श्वभूमी: बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची फसवणूक
२०१२ पासून राज्य सरकारने शिक्षक भरतीवर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करून जळगावसह नाशिक, नागपूर, भंडारा, बीड, लातूर आणि मुंबईसारख्या जिल्ह्यांत बनावट शासन निर्णयानुसार,बनावट शालार्थ आयडी तयार करून बेकायदेशीर शिक्षक भरती करण्यात आली. शालार्थ प्रणालीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने कटकारस्थान करून शासनाचे फसवणूक करण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य करून काही ठिकाणी हजारो बोगस आयडी तयार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला असून, अपात्र व्यक्तींना सरकारी वेतन मिळवून देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेतलेल्या भरती प्रक्रियेत बनावट शासन निर्णय, बोगस प्रमाणपत्रे आणि ड्राफ्ट स्वीकारून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याचा आरोप आहे. बनावट नियुक्त्या उघडकीस आल्या असून, राज्यभरात हजारोंच्या बनावट शासन निर्णयानुसार नियुक्त्या करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यातील काही शिक्षकांना वेगळ्या शाळेत हलवून त्यांचे वेतन सुरू ठेवण्यात आले, तर काही ठिकाणी एकाच पत्त्यावर दोन शाळा अस्तित्वात असल्याचे दिसून आले आहे,ज्यामुळे फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढली आहे.
अशोक गिरींचे निलंबन: पुराव्यांशी छेडछाडीचा धक्कादायक आरोप
नाशिक रोड पोलिस ठाण्यात तैनात असताना गिरी यांनी जळगाव जिल्ह्यातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान संशयितांकडून पुरावे जप्त केले होते. मात्र, एसआयटीच्या चौकशीत हे पुरावे नष्ट झाल्याचे उघड झाले आहे. गिरी यांच्यावर संशयित संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, शासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
यापूर्वी नाशिकमधील मालेगाव उपसहाय्यक शहरातही समान घोटाळा उघडकीस आला असून, तेथे शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे आणि अधीक्षक सुधीर पगार यांना अटक करण्यात आली आहे.
एसआयटी चौकशी: तीन सदस्यीय समितीचा सखोल तपास, अनेक अडचणीत
राज्य सरकारने जुलै २०२५ मध्ये या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय एसआयटी गठित केली आहे. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील या पथकात पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारून आतार (सदस्य-सचिव) यांचा समावेश आहे. एसआयटीला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, २०१२ पासूनच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील भरतीची पडताळणी केली जाणार आहे.
अटका आणि निलंबने: आतापर्यंत उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, लिपिक आणि संस्थाचालक दिलीप धोटे, चरण चेटुले यांना अटक झाली आहे. मालेगावमध्ये तीन वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
संस्थाचालक आणि शिक्षकांना नोटिस:
जळगावमधील संशयित शिक्षकांची लातूर येथील एसएससी बोर्ड अध्यक्षांसमोर सुनावणी झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) देखील या प्रकरणात सक्रिय झाला असून, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता आहे.
या प्रकरणाने महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कडक नियम लागू होण्याची अपेक्षा आहे.












