पाडळसे येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथास्थळ परिसरात रानडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाकडून बंदोबस्त लावण्याची लाखो भाविकांची अपेक्षा
तापी नदीपात्रात सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश बंदी

भुसावळ – यावल तालुक्यातील पाडळसे (भुसावळ–फैजपूर मार्गावरील) शिवारात पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन पुन्हा एकदा करण्यात आले आहे. ही कथा १० मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार असून, या धार्मिक सोहळ्यासाठी सुमारे ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार ४ मार्च २०२६ रोजी सभास्थळी नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला भुसावळ व फैजपूरचे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
व्यापक नियोजन आणि सुविधा
कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विविध सुविधांची आखणी करण्यात आली आहे. सभास्थळाच्या एक किलोमीटर परिसरात कोणतेही खाजगी वाहन विनापरवानगी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते शौचालय, कंट्रोल रूम, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली.
भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर आदी भागांतून येणाऱ्या एसटी बस आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तापी नदीकाठावर जाण्यास पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभास्थळी सुमारे १०० स्टॉल उभारण्यात येणार असून, भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नदानासाठी विशाल किचनची व्यवस्था करण्यात आली आहे,ज्यामुळे लाखो भाविकांना महाप्रसादाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवर संताप
बैठकीदरम्यान आयोजकांनी भुसावळ शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गालगत जळगाव रोडवरील ‘वाय पॉईंट’ पासून तापी नदी पुलापर्यंत असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला. गेल्या वर्षभरापासून हे खड्डे न भरल्यामुळे वारंवार किरकोळ अपघात होत असून भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे, अशी तक्रार आयोजकांनी केली.
आयोजकांनी सांगितले की, याबाबत भुसावळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. बैठकीत संबंधित अधिकारी कोण आहेत, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर पाठीमागे बसलेले चंद्रशेखर तायडे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वर्तनाला मुजोरी मानून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसी यांच्यातील हद्दवादामुळे गेल्या काही महिन्यांपासून या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात अडथळे येत असल्याच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याचीही खंत आयोजकांनी व्यक्त केली.
वन्यप्राण्यांच्या धोक्याबाबत चिंता
कार्यक्रमाचे ठिकाण असलेल्या परिसरात रानडुकरांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जाते. तसेच सुमारे १५ दिवसांपूर्वी दुसखेडा परिसरात रानडुकरांसाठी लावलेल्या जाळ्यात एक बिबट्या अडकून ठार झाल्याची घटना घडली होती. याशिवाय मागील वर्षी पाडळसे-वनोली व तापी नदीच्या भागात कंडारी शिवारातही बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते. अशा परिस्थितीत मुक्ताईनगर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सभा परिसरात अचानक बिबट्या किंवा रानडुकरांनी उच्छाद मांडल्यास गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अतिक्रमण हटविण्याचे आदेश
यावेळी भुसावळ शहरातील गांधी पुतळा ते तापी नदीपर्यंतच्या सर्व हातगाड्या व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी बैठकीत दिली आहे. या बैठकीला भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी बडगुजर, भुसावळच्या तहसीलदार निता लबडे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासह आरटीओ विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, भुसावळ-फैजपूर-सावदा नगरपरिषद प्रशासन, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.













