‘बॅनर तेच नेता नवा’ पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या नेत्याचे बॅनर झळकले, चर्चांना उधाण
'राज्याचे दमदार दादा' च्या शेजारीच भावी मुख्यमंत्रीचा बॅनर
पुणे तिथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. पुणेरी पाट्या आणि बॅनर जगप्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा नेहमीच होत असते.तसेच बॅनरची पण चर्चा होते. पुणे शहरात अनेक हौशे,नवशे गवशे त्यांच्या गल्ली पुढाऱ्यांसाठी भावी नगरसेवक ,भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून नेहमीच बॅनरबाजी करून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असतात. पण आता एका वेगळ्याच बॅनरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असून त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.निवडणूकीसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार असणार आहेत. परंतु विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणखी एका व्यक्तीचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे.
ते नेते म्हणजे शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे. तानाजी सावंत यांना संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला गेला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरलेला आहे. पुण्यातील कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आलेलं आहे.
‘बॅनर तेच नेता नवा’
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ‘राज्याचे दमदार दादा’ अशा स्वरूपाच्या बॅनरच्या शेजारीच हे बॅनर लावण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.याच ठिकाणी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अजित पवार यांनी आपली महत्वकांक्षा मुलाखतीच्या माध्यमातून आणि जाहीर भाषणांमधून अनेकदा बोलून दाखवली आहे.आता ‘बॅनर तेच नेता नवा’ अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.