भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या नुतन सह. पतपेढीतील 9 कोटी 90 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 16 जणांना 14 दिवसांची MCR

भुसावळ – प्राथमिक शिक्षकांची नुतन सहकारी पतपेढी मर्यादीत भुसावळ ता. भुसावळ जि जळगाव या संस्थेत पदाचा गैरवापर आणि कट कारस्थान करुन, खोट्या व बनावट सह्या करुन, हेतुपुरस्कर रित्या व केलेल्या निष्काळजीपणामुळे केलेल्या कृत्याबाबत वेळोवेळी प्राप्त झालेल्या माहीतीच्या आधारे संस्थेचे दिनाक ०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२१ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण केले असता, पोटनियमबाह्य कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन व खोटे व बनावट कर्जप्रकरणे मंजुर करुन, बेकायदेशीर वाटप केले आहे. तसेच वसुल न झालेल्या कर्जामुळे सभासदांचा व संस्थेचा विश्वासघात झालेला असुन, संस्थेचा कारभार पार पाडण्यात पदाचा दुरुपयोग करुन, सभासदांचे व संस्थेची फसवणुक केलेली आहे. संस्थेच्या निधीची अफरातफर, गैरव्यवहार व गैरविनीयोग करुन, त्यांना असलेल्या पदाचा दुरुपयोग करुन, रक्कम स्वताच्या फायद्यासाठी वापरली व संस्था सभासद व संस्थेची फसवणुक करुन विश्वासघात केलेला आहे. व संस्थेच्या रक्कमांचा संगणमताने अफरातफर करुन, एकुण ७२९ चेक बनावट व १७५ सभासदांची नावांचा वापर करुन, संस्थेची ९कोटी ९० लाख ३४, ७९९ रुपये अर्थिक फसवणुक केली आहे. बाबतची बाब लेखापरीक्षक श्री प्रकाश प्रल्हाद चौधरी यांच्या निदर्शनास आल्यावरुन त्यांनी नमुद संस्थेच्या तत्कालीन आजी माजी संचालक मंडळ, कर्मचारी असे एकुण ४५ जणांवर भुसावळ शहर पोलीस स्टेशन गुरक्रं. १७९/२०२५ भादवि कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, २०१, १२० (ब), ३४ प्रमाणे दिनाक २८/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता श्री डॉ महेश्वर रेड्डी यांनी सदरचा गुन्हा अर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे तपासाकरीता वर्ग केला होता. त्याअनुषंगाने अर्थिक गुन्हे शाखा जळगाव कडील श्री संदीप पाटील पोलीस निरीक्षक, अर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांनी एकुण १६ आरोपींना दिनाक २८/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. नमुद आरोपींना दिंनाक २९/०७/२०२५ रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयात तपास अधिकारी व अभियोक्ता यांच्यात जवळपास २ तास युक्तीवाद चालला मा. न्यायालयाने नमुद आरोपीतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव भाग, तसेच मा. कृष्णांत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, श्री गणेश फड, सहायक पोलीस निरीक्षक, श्रीमती शुभांगी पाटील पोलीस उपनिरीक्षक, सफौ दिनेश पाटील, पोहवा रतिलाल पवार, भरत जेठवे, निलेश सुर्यवंशी, समाधान पाटील, कपिल चौधरी, नापोशि ईश्वर धनगर, विजय शिरसाठ, पोशि दिलीप चव्हाण, गुंजाळ,दिपक पाटील,महेंद्र सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास श्री संदीप पाटील पोलीस निरीक्षक, अर्थिक गुन्हे शाखा जळगाव हे करीत आहेत.
1 कोटी 93 लाखांचेही प्रकरण चर्चेत
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपूर्वी नुतन सभापती प्रदिप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी संस्थेत यापूर्वी बोगस पद्धतीने मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणांची माहिती घेऊन त्याबाबत संचालक मंडळाची बैठक घेऊन वर्ष 2021ते 2023 या वर्षात 1 कोटी 93 लाखांच्या वर बोगस पद्धतीने RTGS रक्कम वर्ग करून अपहार केल्याप्रकरणी पत्रकार परिषदेत मागील संचालक मंडळावर आणि काही कर्मचाऱ्यांवर आरोप करून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. मात्र याप्रकरणी अजून तपास सुरू असून गुन्हे दाखल करण्यासाठी जळगाव उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती समोर आलेली आहे.












