अर्थकारणजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशनची स्थापना होणार,CM देवेंद्र फडणवीस व मंत्री संजय सावकारेंमध्ये टेक्सटाईल पार्कबाबत बैठक

भुसावळला मोठा टेक्सटाइल पार्क स्थापन होण्याचे संकेत

मुंबई, दि-३१/१२/२४, : महाराष्ट्रात टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना करणे, नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभाग घेणे, टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागविणे तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

भुसावळला टेक्सटाईल पार्क होणार ?

सह्याद्री अतिथीगृह येथे वस्त्रोद्योग विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आढावा घेतला. यात राज्यभरातील मागील काळातील प्रस्तावित टेक्सटाइल पार्कचे विषय पटलावर ठेवण्यात आले होते. यात गेल्या कालखंडात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि चाळीसगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, त्यासंदर्भात देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. गेल्या काही दशकांपासून जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीसह इतर ठिकाणी एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकलेला नसल्याने यावेळी जळगाव जिल्ह्याला खास करून भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारेंना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळाल्याने आता भुसावळ औद्योगिक वसाहतीमध्ये मोठा टेक्स्टाईल पार्क स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. नामदार संजय सावकारेंच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला पहिल्यांदाच उद्योग क्षेत्राशी संबंधित कॅबिनेट मंत्रालय मिळाल्याने मिळालेल्या संधीचे ते आता कसे सोने करतात, याकडे भुसावळ मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.गेल्या अनेक दशकांपासून जळगाव जिल्ह्यातील काही जेष्ठ नेत्यांनी उद्योजक असलेल्या नातेवाईकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक जिल्ह्यात उद्योग उभे राहू दिले नसल्याचे बोलले जाते. मात्र आता नामदार संजय सावकारे यांचा रूपाने नवा तरूण तडफदार उच्चशिक्षित नेता याबाबत पुढाकार घेत असल्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण पाठबळ ना.संजय सावकारेंच्या पाठीशी असल्याने टेक्स्टाईल पार्कसह संलग्न नवउद्योगनिर्मितीची नवी आशा निर्माण झालेली आहे. तसेच नवे स्टार्टअप देखील या ठिकाणी उभे राहू शकतात. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या १०० दिवसांमध्येच याचा रोडमॅप तयार करून त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करून वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन केल्यानंतर त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भुसावळ येथील रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाची भव्य आणि सुलभ कनेक्टिव्हिटी तसेच मोठ्या प्रमाणावर होणारे कपाशीचे उत्पादन पाहता येथे टेक्सटाईल पार्क स्थापन झाल्यास त्यावर आधारित छोटे-मोठे वस्त्र निर्मिती उद्योग सुरू होऊ शकतात. तसेच कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यातच स्थानिक पातळीवर कापसाला हमीभाव मिळून याठिकाणी दहा ते पंधरा हजार प्रत्यक्ष आणि पाच हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील मरणासन्न अवस्थेत निघालेल्या सुतगिरण्यांना टेक्स्टाईल पार्क उभारणीनंतर मोठा निधी उपलब्ध करून देऊन त्यांना नवसंजीवनी देऊन त्यांच्या माध्यमातूनही रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आल्याची माहिती आजच्या बैठकीतून समोर आलेली आहे. कारण जळगाव जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे नामदार संजय सावकारे हे वस्त्रोद्योग मंत्रालयासह राज्य पणन महासंघाचे संचालक सुद्धा असल्याने येणाऱ्या काळात टेक्सटाईल पार्क आणि सुतगिरण्यांचे पुनरूज्जीवन करण्याबाबतचे मंजुरीसह विविध प्रस्ताव शासन दरबारी जास्त काळ प्रलंबित राहणार नसल्याचे चालू घडामोडींवरून दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या दृष्टीने वृध्दापकाळासाठी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करण्याबाबत योजना तयार करावी. तसेच प्रसार भारती यांच्या सहकार्याने ‘करघा’ या  पारंपरिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करावा. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करून राज्यातील सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत.

काल रात्री झालेल्या या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button