मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाची धुव्वाधार बॅटिंग,लोकल सेवेवर परिणाम,चाकरमान्यांची उडाली तारांबळ
मुंबई दि:14 मुंबईतील नागरीकांना साधारण तीन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आणि उन्हाचा दाह सोसून दिल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत काळ्या ढगांची दाटी झाली आणि शुक्रवारी पहाटेपासूनच कोसळणारा धुव्वाधार पाऊस मुंबईत जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. मुंबई, पालघर,ठाणे, कल्याणसोबतच नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसानं आज पहाटे पासूनच दमदार हजेरी लावली. दिवस उजाडूनही शहरात पावसामुळं झालेला काळोख अद्यापही कायम असून, पुढील काही तास किंबहुना दिवसभर हीच परिस्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान पहाटेपासून सुरु झालेल्या या पावसामुळं लगेचच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि याचे थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाले. अनेक भागांमधील वाहतूक मंदावली. तर, काही ठिकाणी वाहतूक विभागाकडूनच पर्यायी मार्ग सुरु करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर,दादर,ते अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली येथे पावसाची जोरदार हजेरी असल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे वाहतुकीससाठी बंद ठेवण्यात आला आहे.या धुव्वाधार पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत आहे. 14जुलै ते 19 जुलै पर्यंत ‘एमएमआर’ क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.