राजकीय गुंडांच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्तालयाचे (DCP zone) ना.संजय सावकारेंचे स्वप्न आता होणार साकार !
भुसावळ दि-१८/१२/२४, नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा ‘व्हाईटवाश’ केल्यानंतर भाजपाने नामदार गिरीश महाजन आणि संजय सावकारे दोन दिग्गज नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असून त्यांच्या जिल्ह्यातील आगमनाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झालेले आहे.त्यातच भुसावळ विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्यांनी निवडून आलेले आणि माजी पालकमंत्री राहिलेले सुसंस्कृत, उच्चशिक्षित अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या ना.संजय सावकारे यांना २०१३ मध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतर भुसावळ तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे. याच कारण म्हणजे ना.संजय सावकारेंना २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आणण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर ते निवडून देखील आले, मात्र मधल्या कालखंडात एकनाथराव खडसेंवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडीसह विविध चौकशांचा ससेमिरा मागे लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मात्र ना.सावकारेंनी भाजपशी एकनिष्ठ राहत पक्षाची साथ सोडली नाही. त्या एकनिष्ठतेचंच फळ आज ना.सावकारेंना कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपाने मिळालेलं आहे. तर एकनाथराव खडसेंची राजकीय परिस्थिती आज कशी आहे ? हे सर्वश्रूत आहे.गेल्या आठवड्यात खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्विक वाद ‘होते’ ,असा दावा करून घरवापसीचे संकेत दिलेले आहेत. खडसेंनी ना.संजय सावकारेंना राष्ट्रवादीतून भाजपात आणले होते.आता ना. सावकारे हे खडसेंना राष्ट्रवादीतून भाजपात आणण्यासाठी प्रयत्न करतील का ? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.
राजकीय गुंडांच्या बंदोबस्ताचे आव्हान !
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका जाहीर प्रचार सभेत बोलताना ना.संजय सावकारे यांनी भुसावळची गुन्हेगारी संपविण्यासाठी आयपीएस असलेल्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या खमक्या अधिकाऱ्याची गरज अधोरेखित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने “महाराष्ट्र आता थांबणार नाही” हे प्रगतीचे घोषवाक्य अधोरेखित केलेले आहे. त्याचेच प्रतिबिंब म्हणून “भुसावळ आता गुन्हेगारी हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही” हे स्लोगन अभिप्रेत झालेले आहे. भुसावळकरांना देखील शांततेने निर्भय वातावरणात जगण्याचा हक्क असून ना.सावकारेंकडून असणाऱ्या अनेक आशा-आकांक्षांचे ओझे आता ना.संजय सावकारेंना डोक्यावर घ्यावे लागणार आहे. जनतेच्या मनात आता नवीन सावकारे पर्वाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. आज ना.सावकारेंना स्वतः कॅबिनेट मंत्रीपद असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे ते आता अत्यंत निकटवर्तीय झाल्याने भविष्यातील भुसावळ जिल्हा निर्मिती, नवगुन्हेगारीचा चढता आलेख विचारात घेता, गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट उखडून टाकण्यासाठी, आणि अवैध धंद्यांच्या सुळसुळाटाला पायबंद घालण्यासाठी लवकरच पोलिस उपायुक्तालयाची फलश्रुती होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुसावळसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत बाहेरील उद्योगांना आणण्यासाठी आधी उद्योजकांसाठी भयमुक्त वातावरण असते गरजेचे आहे.तरच येथे नवीन उद्योग उभारणी होऊन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे भुसावळसह पंचक्रोशीतील अनेक राजकीय गुंडांचा बंदोबस्त लवकरच केला जाणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत.