राज्यातील हजारो कर्मचारी व मातंग समाजाच्या प्रश्नांवर कार्यवाही अंतिम टप्प्यात, आ.संजय सावकारेंच्या प्रयत्नांना यश
मुंबई, दि. 08/08/2024: राज्यातील हजारो अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. या हजारो कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर वेगवान कार्यवाही करण्यात येत आहे. हे सर्वसामान्यांचे शासन असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज अधिवेशनात केले आहे.
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाला संबोधित करताना मंत्री श्री. देसाई बोलत होते. कार्यक्रमाला भुसावळचे आमदार संजय सावकारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संघटनेचे अनिल कोल्हे, सतिश गोटमुकळे, मारोती कांबळे, श्रीमती मयुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे मुख्यमंत्री असल्याचे सांगत मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांनी नागपूर अधिवेशनदरम्यान विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथे बैठक घेण्याचे सांगितले. त्यानुसार मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे पाहुणे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, सकल मातंग समाजाच्या उत्थानासाठी शासनाने ‘आर्टीची’ स्थापना करण्याचा शब्द दिला. त्यानुसार ‘आर्टीची’ स्थापना करून कार्यालयाचे कामकाजही सुरू केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रूपये दरमहा बहीणींच्या थेट बँक खात्यात देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना निश्चितच आर्थिक हातभार मिळणार आहे.
सरकार मागासवर्गीयांच्या पाठिशी-आ.संजय सावकारे कार्यक्रमादरम्यान भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की ,हे सर्वसामान्यांचे सरकार असून मागासवर्गीय समाज बांधवांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. आपल्या सर्व मागण्या या ठिकाणी सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून त्याबाबतची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे. सतिश गोटमुकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सामाजिक कार्यकर्ते मारोती कांबळे यांनीही विचार व्यक्त केले. या अधिवेशनाच्या कार्यक्रमास हजारो अनुदानित वसतीगृह कर्मचारी उपस्थित होते.