Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रराजकीय

लेवा समाजाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट, भुसावळचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ विरोधात गुन्हा दाखल

दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल

भुसावळ (दि. २७ एप्रिल २०२६) : सोशल मीडियावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, लेवा पाटीदार समाज, मराठा समाज तसेच अनुसूचित समाजाविषयी अवमानकारक, बदनामीकारक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भुसावळातील माजी नगरसेवक मुकेश गंगाराम गुंजाळ यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आधीच तापलेले होते. या पार्श्वभूमीवर मुकेश गुंजाळ (रा. गुंजाळ कॉलनी, भुसावळ) यांनी सोशल मीडियावरील फेसबुक पोस्टद्वारे मंत्री संजय सावकारे तसेच इतर समाजांविषयी अत्यंत अपमानास्पद, खालच्या स्तरावरील आणि द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार नितीन जगन्नाथ नंदवने (वय ४२, रा. जामनेर रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मुकेश गुंजाळ यांनी पवन नाले आणि जितेंद्र सुरेश नेहते यांच्या फेसबुक पेजवरून हे वक्तव्य केले. या पोस्टमध्ये लेवा पाटील समाज, मराठा समाज आणि अनुसूचित समाजाबद्दल अपमानजनक शब्दप्रयोग करण्यात आले असून, मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दलही अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल २०२६) गुन्हा क्रमांक १९५/२०२६ दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९६, २९९ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करत आहेत.
दरम्यान, भोरगाव लेवा पंचायत न्या. पाडळसे, भुसावळ विभागाच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देत म्हटले आहे की, संशयित मुकेश गुंजाळ यांनी फेसबुकवरील एका पोस्टवर केलेली टिप्पणी समाजात तेढ निर्माण करणारी आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगराध्यक्षांविषयी उल्लेख करत लेवा पाटील समाजाबद्दल अवमानकारक आणि अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. समाजाप्रती आक्षेपार्ह शब्दप्रयोगांमुळे समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचला असून, या टिप्पण्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अशा प्रकारच्या भडकावू वक्तव्यांमुळे जातीय तेढ वाढू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहरात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, शहरातील सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. कोणत्याही जाती-धर्माबद्दल अनादर करणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
त्यांनी पुढे सांगितले की, सोशल मीडियावरील अॅडमिनांनी योग्य सेंटरिंग केल्यास अनावश्यक वाद टाळता येतील. नागरिकांनी शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हे संपूर्ण प्रकरण भुसावळ नगरपरिषदेतील अलीकडील राजकीय घडामोडींशी जोडले गेले आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेवरून निर्माण झालेल्या वादानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. त्यातच मुकेश गुंजाळ यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे लेवा पाटीदार समाजामध्ये नाराजी निर्माण झाली असून, यामुळे राजकीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुकेश गुंजाळ यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp