शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर अचानक क्रॅश झाल्याने खळबळ
रायगड- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर आज सकाळीच क्रॅश झाल्याची दुर्घटना समोर आलेली आहे. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
सुषमा अंधारे गुरूवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या. याठिकाणची सभा आटपून त्या आज बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली.
सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँड होत होते. तेव्हा अचानक हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, पायलट हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी अचानक मोठा आवाज होतो आणि हेलिकॉप्टर कोसळते. ही घटना कशामुळे घडली याच कारण अद्याप समोर आले नाही. पण या घटनेमध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणारा पायलट आणि त्याचा असिस्टंट सुखरूप आहे.
या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, ‘मला बारामतीला महिला मेळाव्यासाठी जायचे होते. संध्याकाळी मंडणगडमध्ये रॅली होणार आहे त्यामुळे परत यायचे होते. ९ वाजता हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार होते. पण हेलिकॉप्टरला बराच वेळ लँडिंग व्हायला लागला आणि अचानक ते पडले. आम्हाला २ ते ४ मिनिटं काहीच कळाले नाही. आतल्या माणसांचे काय झाले असेल याची मला चिंता होती. पण कॅप्टन आणि त्याचा असिस्टंट सुरक्षित आहे.’
तसंच, ‘मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही या विमानातून प्रवास करणार होतो. आम्ही सर्वजण सुखरूप आहोत त्यामुळे चिंता नसावी. नेमकं काय घडलं हेच कळाले नाही. या अपघाताचे कारण आताच सांगता येणार नाही.’, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पण या घटनेमुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे.