Advertisement
जळगावराजकीय

शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये सट्टा मटका व अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला,बोगस बिलांना चाप लावण्याचे संकेत

सट्टा मटका पहिल्याच मीटिंगमध्ये गाजणार

भुसावळ, दि. ७ जानेवारी २०२६: शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील जुन्या तालुका पोलीस स्टेशन शेजारील जागेवर अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ बांधकामाचे काम थांबवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात माजी आमदार संतोष चौधरी यांनी लक्ष घालत भाजपा नगरसेवकांवर स्टंटबाजीचा आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी दावा केला की, मूळात या जागेवर व्यापारी संकुल मंजूर असताना जलकुंभ बांधण्याचा आग्रह धरला जात आहे. याशिवाय काहींना संतोषी माता सभागृहाजवळील जागा ‘पचवायची‘ असल्याने हा सर्व प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, गंगाराम प्लॉट परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ जलकुंभाचे काम थांबवण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी दिले असून, याबाबत त्यांनी माध्यमांना स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र, या वादाने तीव्र रूप धारण केल्यानंतर माजी आमदार चौधरी यांनी सखोल माहिती घेतली असता, त्या जागेवर पूर्वीच व्यापारी संकुल मंजूर असल्याचे समोर आले. तरीही जलकुंभ बांधण्याचा अट्टहास का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच,या खोदकामातून उचललेली माती संतोषी माता सभागृहाजवळ टाकण्यात आल्याने काहींचा ती जागा ताब्यात घेण्याचा डाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हे जलकुंभाचे काम मूळातच बंद होते. जलकुंभ कोणत्या जागेवर बांधायचा किंवा नाही, हे निर्णय नगराध्यक्षा आणि संबंधित प्रभागातील नगरसेवक घेतील. भुसावळकर नागरिक सुशिक्षित असून, काही ‘अनपढ रिंगमास्टर‘ लोक त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पलटवारही त्यांनी (कुणाचेही नाव न घेता) केला आहे.

हाच तो ‘अमृत’ चा खड्डा

दरम्यान, भुसावळ महानगरपालिकेत बोगस बिलांचा प्रकार आता थांबणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. अमृत योजनेअंतर्गत शहरातील सर्व जलकुंभांची तपासणी होईल. वापरलेल्या पाईपांचा दर्जा तपासला जाईल. नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे या स्वतः घटनास्थळी जाऊन कामाची गुणवत्ता पाहूनच बिले अदा करण्याचे आदेश देतील, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली.
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये सट्टा मटका आणि अनधिकृत बांधकामाचा मुद्दा
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये काही गाळ्यांमध्ये अवैध सट्टा मटका चालत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, काही संडास-बाथरूम तोडून अनधिकृतपणे गाळे बांधण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात येत्या १७ जानेवारीच्या प्रशासकीय सभेत कारवाई करण्यात येईल. शहरातील सर्व जीर्ण व्यापारी संकुलांचा पुनर्विकास किंवा दुरुस्ती करण्याबाबतही पावले उचलली जातील.
याशिवाय, भुसावळ शहरात नवीन व्यापारी संकुलांची निर्मिती करून सुमारे ५००० गाळे बांधून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिले आहे. नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपाय योजनाबद्धपणे राबवले जातील, असे त्यांनी सांगितले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button