दलबदलू नेत्यांची विश्वसनीयता कमी होऊ लागली आहे, नितीन गडकरींचे रोखठोक मत,राजकीय नेत्यांचे टोचले कान
नागपूर दि-08/09/2024, आपल्या स्पष्टवक्तेणामुळे देशभर परिचित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी राज्यातील खोटारड्या आणि दलबदलू राजकारण्यांना रोखठोक भाषेत परखडपणे मत मांडून चांगलेच धारेवर धरलेले आहे. राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे, असे काही नेत्यांना वाटतं. काही नेते तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे रोखठोक मत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकारण्यांचे कान टोचले आहेत. आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव पंथीय संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे गडकरी म्हणाले की ,लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात मी बोललो होतो की, मी जातपात पाळत नाही, मला वोट द्या, किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असंही बोललो होतो. चक्रधर स्वामी यांनी ही हाच संदेश दिला होता. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हे सर्व भेद संपले पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे, असं स्पष्ट मत मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेलं आहे.
राजकारण्यांनी लबाडी न करता चांगलं काम करावं, जनतेचा आशीर्वाद नेहमी पाठीशी कायम राहतो. त्यामुळेच जनतेत आपली विश्वासार्हता टिकून राहते, काम असे करावं की काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे, मात्र, आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे नेते ही आहेत. असे सांगून गडकरींनी राजकारण्यांना चांगलाच टोला हाणलाय. गडकरींच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.