दिपनगर वीजनिर्मिती केंद्रामुळे परिघातील वायुप्रदूषणाने गुणवत्ता धोकादायक पातळी ओलांडली
मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल होणार

भुसावळ दि-28/02/2025,भारत सरकारने लागू केलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1981 च्या तरतूदीनुसार जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 नुसार प्रस्थापित झालेल्या मंडळाकडे हवा प्रदूषण नियंत्रणाचे कार्य सोपविण्यात आलेलं आहे. एखादे क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून अधिसूचित झाल्यानंतर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिनियमातील तरतुदी प्रमाणे त्या प्रदेशातील उद्योगांना आपला कारखाना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमतीपत्र मिळावावे लागते. संपूर्ण महाराष्ट्र राज्य हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी मंडळाकडे संबंधित कंपनीला अर्ज करावा लागतो. अशी संमती देताना प्रदूषण मंडळाला अशा उद्योगाकडून होणाऱ्या प्रदूषणाची कारणे, प्रक्रियेत वापरण्यात येणारा कच्चामाल, हवा प्रदूषण नियंत्रणाची आवश्यकता हवा प्रदूषण नियंत्रणाची उत्तम पद्धती कोणती ? याबाबत तपासणी, देखरेख व अभ्यास कायम करावा लागतो. त्यासाठी उद्योगांना नेहमी भेटी देणे आणि तेथील उत्सर्जित होणाऱ्या वायुबाबत वेळोवेळी उपाय योजनांबाबत सूचना व उचित कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून होणाऱ्या वायूप्रदूषणा बाबत राष्ट्रीय हरित लवादाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनुपालन होत नसून त्याबाबत कोणतीच आवश्यक कार्यवाही होताना दिसून येत नाही.

हवेची गुणवत्ता शासनाच्या एअर क्वालिटी इंडेक्स नावाच्या मॅट्रिक्सचा अर्थात परिमाणाचा वापर करून मोजली जाते. सदरील वेबसाईट वातावरणातील वायू प्रदूषणातील चालू बदल दर्शवत असते.चांगले आरोग्य आणि पर्यावरण टिकवण्यासाठी स्वच्छ हवा अत्यंत महत्त्वाची आहे. आपले वातावरण प्रामुख्याने पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन व नायट्रोजन या दोन महत्त्वाच्या वायुंनी बनलेले आहेत. ऑक्सिजन आणि नायट्रोजनसह वातावरणातील आठ प्रमुख वायू प्रदूषकांवर AQi अचूक लक्ष ठेवून निष्कर्ष नोंदवत असते.

AQI च्या निर्देशानुसार हवेची प्रदूषणाची निर्देशांक पातळी जर 150 च्या वरती गेल्यास 15 वर्षांखालील बालके, 50 वर्ष वर्षांच्या वरील वयांच्या व्यक्तींसाठी आणि श्वसनाचे ,हृदयरोगाचे आणि फुफ्फुसांचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी अशा वातावरणात राहणे, बाहेर जास्त वेळ कोणत्याही क्रियाकलाप करणे धोकादायक समजले जाते. दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पात २१० मेगावॅटचा कालबाह्य प्रकल्प सुरू असून, त्यासोबतच ५५० मेगावॅटचा प्रकल्पही सुरू आहे. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर राख उत्सर्जित होऊन चिमणीद्वारे जवळपासच्या ५-७ किमी परिघातील हवेत मिसळत असते. तसेच आता नव्याने सुरू होणाऱ्या 660 मेगावॅटच्या प्रकल्पाची उभारणी व चाचणी पूर्ण झालेली असून तो ही लवकरच कार्यान्वित होणार असल्याने प्रदूषणाची पातळी आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदरील प्रकल्पातून बल्करद्वारे राखेची वाहतूक करताना ही राख हवेत उडून मिसळत असते. याबाबत जानेवारी महिन्यात जळगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत सदरील बल्करच्या बेशिस्त वाहतूकीमुळे राखेच्या धुलीकणांसह मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते.तसेच दीपनगर जवळ महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी बल्कर उभे करण्यास प्रतिबंध घातलेला असतानाही त्यावर पोलिसांकडून उचित कार्यवाही होताना दिसून येत नाही.
हवेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर
दीपनगर प्रकल्पाचा दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजीचा एअर क्वालिटी इंडेक्स निर्देशांक हा तब्बल १७० वर पोहोचलेला असून हवेची ही गुणवत्ता आता धोकादायक पातळीवर पोहोचलेली असून ती मानवी जीवनासह सजीवसृष्टीसाठी धोकादायक श्रेणीत गणली जाते. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील या प्रकल्प बाधित क्षेत्रातील नागरिकांसह सजीव सृष्टी धोक्यात आलेली असून याबाबत जबाबदार असलेले दीपनगर प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उदासिन दृष्टीकोन दिसून येत आहे.

निर्देशांकाचा बोर्ड बंद अवस्थेत
दरम्यान , दीपनगर प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर लावलेला प्रदूषणाची निर्देशांक मात्रा दर्शविणारा डिजीटल फलक देखील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून तो 24 तास चालू ठेवणे बंधनकारक असताना त्याला कार्यान्वित करण्याची कार्यवाही दीपनगर प्रशासनाकडून करण्यात आल्याचे दिसून येत नाही. वायू प्रदूषण सजीवांसाठी चांगले नाही, विशेषतः वृद्धांसाठी, विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी आणि बाहेर बराच वेळ घालवणाऱ्या लोकांसाठी वाईट आहे. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे नकारात्मक आरोग्य परिणामांचा अनुभव घेण्याचा धोका असलेल्यांना “संवेदनशील गट” मानले जाते. या श्रेणीमध्ये खालील धोके वर्तविण्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
१)दमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
२)हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा फुफ्फुसांचे आजार असलेले लोक
३)६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे प्रौढ
मुले आणि किशोरवयीन मुले,गर्भवती महिला
४)जे लोक तंबाखूचे सेवन करतात.
५) प्रमुखरस्ते किंवा औद्योगिक क्षेत्रांजवळ राहणारे आणि काम करणारे लोक,
बाहेर उन्हात काम करणारे लोक अशा लोकांसाठी हे प्रदूषण धोकादायक मानले जाते.