
भुसावळ | नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या विविध बोगस विकासकामांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून, या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक 20 मधील नवनिर्वाचित नगरसेवक राज विजय चौधरी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. तरूण तडफदार नवनिर्वाचित नगरसेवक राज विजय चौधरी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे.
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, मागील सुमारे २० महिन्यांपासून भुसावळ शहरात रस्ते, गटार, विद्युत दिवे तसेच अन्य काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना संबंधित कंत्राटदारांकडून डुप्लिकेट व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, बांधकामातही खराब मटेरियलचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही सर्व कामे नागरिकांकडून कररूपाने वसूल करण्यात आलेल्या जनतेच्या पैशातून केली जात असताना, त्याचा दर्जा अत्यंत सुमार असल्यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे अर्जात नमूद आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणीही नगरसेवक राज चौधरी यांनी केली आहे.
तसेच, सदर प्रभागात झालेल्या कामांची बिले काढू नयेत, जोपर्यंत कामांच्या दर्जाची सखोल चौकशी होत नाही, अशी ठाम विनंती अर्जात करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी करून संबंधितांवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भव्य स्मारक उभारणीची मागणी
प्रभाग क्रमांक 20 मधील वैकुंठवासी ह.भ.प. एकनाथ महाराज खडसे यांच्या भव्य स्मारकाचे सुशोभीकरण तसेच भव्य गेट उभारणी करण्याचा प्रस्ताव सभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गौतम नगर व पंचशील नगर या भागांमध्ये असलेल्या बौद्ध विहार व आंबेडकर विहार परिसरातील भव्य दिव्य गेटची उभारणी, तसेच संबंधित सार्वजनिक हॉलचे नूतनीकरण व दुमजलीकरण करण्याबाबतही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. हे सर्व प्रस्ताव आगामी नगरपरिषदेच्या सभागृह बैठकीत चर्चेसाठी घेऊन त्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती अर्जात नमूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय, हजरत महादेव बाबा दर्ग्याच्या दुमजलीकरण व दुरुस्ती संदर्भातही प्रस्ताव मांडण्यात आला असून, शहरातील धार्मिक व सामाजिक स्थळांचा विकास होणे आवश्यक असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे.
शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या भावनिक व सांस्कृतिक जडणघडणीशी संबंधित असलेल्या स्मारक, विहार, दर्गा व सार्वजनिक हॉल यांचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, संबंधित सर्व प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय व सभागृह स्तरावर मंजुरी देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.













