भुसावळ जवळ भरधाव डंपरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू ; संतप्त ग्रामस्थांनी डंपर दिला पेटवून

भुसावळ- भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील तपत कठोरा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात डंपरखाली दुचाकी चिरडली जाऊन एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली चार वर्षीय नात सुदैवाने थोडक्यात बचावली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावून पेटवून दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपत कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (वय ५५) हे आपल्या चार वर्षीय परी या नातीसह एमएच-१९-बीएक-९३२० क्रमांकाच्या दुचाकीवरून पिंप्रीसेकम रस्त्यालगतच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी शेतशिवारातील अरुंद रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी आलेला एमएच-१९-ईयू-३७३७ क्रमांकाचा डंपर मागे घेत (रिव्हर्स) होता. रस्ता अरुंद असल्याने आणि डंपर चालकाचे दुर्लक्ष झाल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर आनंदा पाटील आणि त्यांची दुचाकी डंपरच्या चाकाखाली दाबली गेली. या भीषण अपघातात आनंदा पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या सोबत असलेली चार वर्षीय परी ही बालिका चमत्कारिकरित्या बचावली.
अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी डंपरखाली अडकलेली दुचाकी आणि आनंदा पाटील यांना बाहेर काढून तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आनंदा पाटील यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याचा आरोप करत नागरिकांनी घटनास्थळीच डंपरला आग लावून पेटवून दिले. डंपरने काही वेळातच पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
या घटनेमुळे तपत कठोरा व परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतशिवारातील रस्त्यांवर सुरू असलेल्या मुरूम वाहतुकीबाबत आणि अवजड वाहनांच्या बेफिकीर हालचालींबाबतही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.













