सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी नगरपालिका प्रशासनाविरोधात सफाई कामगार आयोगापुढे संतोष थामेत यांनी मांडली आक्रमक भूमिका
सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षांची वादळी बैठक

भुसावळ – : “वाल्मीक समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगतिशील होण्याचा मार्ग स्वीकारावा आणि समाजात नवा आयाम निर्माण करावा,” असा आशावाद महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केला. बुधवार, दि. १६ जुलै रोजी त्यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.
भुसावळच्या इतिहासात सर्वाधिक ५ दिवस चाललेले आमरण

भुसावळ नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी गेल्या महिन्यात पाच दिवसांचे आमरण उपोषण केलेले होते. भुसावळ शहरात गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या हिमतीने तब्बल पाच दिवसांचे आमरण उपोषण कोणत्याही संस्थेच्या किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केलेले नव्हते. त्यामुळे या धाडसी आमरण उपोषणाची संपूर्ण जळगाव जिल्हाभरात चर्चा सुरू झालेली आहे. आज भुसावळ नगरपरिषदेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत संतोष थामेत यांनी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान आणि मुख्याधिकारी यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मोठ्या पोटतिडकीने कामगारांची बाजू मांडून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. त्याची आज सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दखल घेऊन नगरपालिकेतील सर्व सफाई कामगारांचे प्रलंबित मागण्यांची मागणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी मुख्याधिकारी यांना आदेशित केलेले आहे.

मुकेश सारवान हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यांनी भुसावळ भेटी दरम्यान सफाई कामगारांच्या अडचणी, तक्रारी यांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निराकरणाचे निर्देश दिले.

सारवान यांनी स्पष्टपणे सांगितले की, सफाई कामगारांच्या कामाशी संबंधित दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. भुसावळ शहरातील सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता, राज्य शासनाकडे कामगार संख्यावाढीसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धुळे महापालिकेत लाड समितीच्या शिफारशींच्या अधीन राहून ३० जागांची भरती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, रावेर नगरपालिकेतही सफाई कामांशी संबंधित कंत्राटे वाल्मीक समाजाच्या सामाजिक संस्थांना देण्यात आली आहेत. सफाई कामांमध्ये या समाजाच्या संघटनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीस मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख, आस्थापना प्रमुख वैभव पवार, नगर अभियंता पंकज मदगे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नितीन चौधरी, आरेखक महेश चौधरी तसेच वाल्मीक समाजाचे अध्यक्ष मिथुन बारसे यांची उपस्थिती होती.

शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रावेर जिल्हाध्यक्ष समाधान महाजन आणि भुसावळ शहरातील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख पवन नाले हे देखील उपस्थित होऊन त्यांनी देखील सफाई कामगारांच्या या मागण्यांच्या बैठकीत आणि चर्चेत सहभाग घेतलेला आहे.
या बैठकीदरम्यान सफाई कामगारांच्या संघटनांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न आणि समस्यांवर सखोल संवाद साधण्यात आला. सफाई कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावावे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सारवान यांनी स्पष्ट केले.













