राजकीय

मंत्री गुलाबराव पाटील 20 वर्षांपासून सत्तेत मात्र कोणाला कधीच पंढरपूर यात्रा घडवली नाही – माजी मंत्री गुलाबराव देवकर

जळगाव : “लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना पैसे मिळत असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण त्यासाठी कोणी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते एकदम चुकीचे आहे. कोणतीही नाती ही भीतीने नाही तर प्रेमाने निर्माण होतात. महायुतीच्या सरकारची दडपशाही हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे,” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी महिलांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. दरम्यान, भाषणाच्या सुरूवातीलाच खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावमध्ये प्रसिद्ध असलेल्या वांग्याच्या भरीताचे नाव काढले. जळगावच्या वांग्याला एक वेगळीच चव असल्याचे सांगून कृष्णा भरीत सेंटरचे आवर्जून नाव घेतले. माजी मंत्री गुलाबराव देवकर व जळगाव दूध संघाच्या संचालक छायाताई देवकर, विशाल-धनश्री देवकर, प्रफुल्ल-दीपाली देवकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले.
महाविआचे सरकार आल्यानंतर शेतीवरील कर शून्य करणार
“काँग्रेस व राष्ट्रवादीने यापूर्वी अनेक योजना आणल्या पण त्यांचा कधी गवगवा केला नाही. याउलट परिस्थिती महायुतीची आहे. त्यांना बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या. मात्र, आता लाडक्या झाल्या आहेत. त्याचा वैयक्तिक मला जास्त अनुभव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्यानंतर महायुतीला आता फक्त बहिणी दिसत आहेत”, असाही घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेती उपयोगी बियाणे, खते, कृषी अवजारे यांच्यावर लादण्यात आलेला कर (जीएसटी) शून्य केला जाईल, असेही खासदार सुळे यांनी सांगितले. तसेच मोठ्या शहरांमधील मेट्रोवर हजारो कोटींचा खर्च होत असताना, गोरगरिबांना काही हजार सुद्धा न देणाऱ्या सरकारचा निषेध त्यांनी केला.
शेतकरी, शेतमजूर, आशा वर्कर महिलांनी मांडल्या आपल्या व्यथा
जळगावमधील मेळाव्याच्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधताना त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. महिलांनी मांडलेले प्रश्न लिहून घेत त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिण्यासह संसदेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठविण्याची ग्वाही त्यांनी महिला वर्गाला दिली. आम्हाला तुमचे १५०० रूपये नकोत, कापसाला १२ हजार आणि सोयाबीनला १० हजार रूपये भाव द्या. आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगार द्या, दारूबंदी करून तरूण पिढी बरबाद होण्यापासून वाचवा, अशी अपेक्षा वैजंताबाई सपकाळे, पाराबाई गोपाळ आदी महिलांनी व्यक्त केली. आशा वर्कर महिलांनी तीन महिन्यांपासून मानधन नसल्याचे सांगून आम्ही पोट भरायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.
माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर डागली तोफ
महिला मेळाव्यात जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. “मंत्री पाटील यांनी हे २० वर्षे सत्तेवर होते. त्यांनी कधी कोणाला पंढरपूर यात्रा घडवली नाही, की नाभिक बांधवांना कीट दिले नाही. आता गुलाबराव देवकर समोर असल्याने त्यांना सर्व काही सूचत आहे. आम्ही तर असे ऐकले आहे, की ते निवडणुकीत पाच हजार रूपये फुली वाटणार आहेत. पण लोकच आता म्हणत आहेत, की त्यांनी कितीही पैसा वाटला तरी येणार तर देवकर अप्पाच. ज्यांनी पान टपरीवरून उचलून आमदार आणि मंत्री केले त्या उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी गद्दारी केली. त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. उमेदवार आणि पक्षाचे काम बघून मतदान करा. जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहासह धरणगावचा उड्डाणपूल पूर्ण करून बालकवी ठोंबरे स्मारक, तालुका क्रीडा संकूल, म्हसावदचा उड्डाणपूल, बहिणाबाईंचे स्मारकाचे काम आमच्या कार्यकाळात सुरु झाले होते. मंत्री पाटील यांना अपूर्ण राहिलेली कामे गेल्या १० वर्षात पूर्ण करता आली नाही. निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना सर्व सूचत आहे”, असाही टोला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लगावला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, प्रदेश सरचिटणीस हेमाताई पिंपळे, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर यांनी केले. तर आभार वाल्मीक पाटील यांनी मानले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button