राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळीच बसले भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत
मुंबई दि-२१ मार्च, राज्यातील मराठवाडा भागातील परभणी,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह हदगाव, नायगाव , अर्धापूर तालुक्यात काही ठिकाणी धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून ते 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवले. सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली तालुक्यासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी सकाळी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी पहिला धक्का, तर सहा वाजून 19 मिनिटापर्यंत दुसरा धक्का जाणवला. यावेळी सिरळी गावात काही घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. 4.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही.
परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के
परभणी जिल्ह्यातही सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये जिल्ह्यात कोणत्याही नुकसानीची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली नाहीये. सदर भूकंपाचं केंद्रबिंदू हे हिंगोली जिल्ह्यात असल्याने 60 किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.