Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

शासकीय दालनात वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी; प्रकल्प संचालकांसह कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

सीईओंच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

जळगाव, दि. १ मे २०२६ (प्रतिनिधी) — जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) जळगाव येथे कार्यरत प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी स्वतःचा वाढदिवस शासकीय कार्यालयातील दालनात केक कापून साजरा केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी शिस्तभंग कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भोळे यांनी यासंदर्भात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, १ मे रोजी प्रकल्प संचालक लोखंडे यांनी त्यांच्या कार्यालयीन दालनात सहकाऱ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत कंत्राटी जिल्हा व्यवस्थापक (विपणन व ज्ञान) हरेश्वर भोई, वाहनचालक नरेंद्र निकम, शिपाई मुन्ना खाटीक आदी कर्मचारी उपस्थित होते. वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या तरतुदींना विरोधात आहे. विशेषतः नियम क्रमांक ४, ५ व २२ चा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच महसूल व वन विभागाच्या २३ जून २०२५ च्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयांमध्ये वैयक्तिक कार्यक्रम घेण्यास मनाई असून, असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

याशिवाय, तक्रारदारांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, प्रकल्प संचालक राजू लोखंडे आणि उमेद अभियानातील अधिकारी हरेश्वर भोई यांच्याविरोधात यापूर्वीही भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर याबाबत तक्रारी करण्यात आल्या असून त्या प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकल्प संचालक राजू लोखंडे तसेच वाढदिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत शासकीय शिस्त व नियमपालनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp