जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांना बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तीन दिवसांची पोलिस कोठडी, मुंबईत गुन्हा दाखल
जामनेरमध्ये पोलिसांनी केली सखोल चौकशी

जळगाव,दि-07/07/25, जामनेर तालुक्यात सर्वपरिचित असलेले राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईतील साकिनाका (अंधेरी पूर्व) येथील लोढा हाऊसवर एका अल्पवयीन मुलीला कामाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लोढा यांना अटक करण्यात आलेली असून याच प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्या वाहन चालकाला देखील मुंबईत अटक करण्यात आली असून आज अंधेरी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार दिनांक 9 जुलै पर्यंत प्रफुल्ल लोढा यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जामनेरच नाही तर जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे यातील पिडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता मुंबईतील साकिनाका पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढलेले आहे. प्रफुल्ल लोढा यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता याबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि गंभीरपणे पोलिस या घटनेचा तपास करत आहे.
याप्रकरणी ४ जुलै रोजी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी मुंबई पोलिसांच्या पथकासह वरिष्ठांच्या आदेशाने जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिस पथकाने याठिकाणी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबविलेले असून, तपासणीत काय हाती लागले हे मात्र अजून समोर आलेले नाही.

त्याचवेळी पहूर पोलिसांनी लोढा यांच्या पहूर येथील व्यापारी संकुलाचीही सविस्तर पाहणी केली आहे. प्रफुल्ल लोढा यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेचा विषय ठरले होते.













