ॲड उज्वल निकम यांचे मंत्रिपद दृष्टीपथात ? मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत, रक्षा खडसेंच्या मंत्रीपदाबाबत म्हणाले की…
लवकरच होणार शपथविधी सोहळा

जळगाव – नामवंत विधिज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर संसदेच्या कामकाजात आता जळगाव जिल्ह्याचे तीन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रावेरच्या खासदार रक्षा खडसे या आधीच केंद्रात राज्यमंत्री असताना, त्यानंतर आता ॲड. निकम यांनाही केंद्रीय मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांसदर्भात सूचक विधान केल्याने, आज सकाळपासून सुरू असलेल्या मंत्रीपदाच्या चर्चांना आता बळकटी आलेली आहे.
ॲड.उज्ज्वल निकम यांनी वडील बॅरिस्टर निकम यांच्या वकिलीचा वारसा समर्थपणे चालवित असताना, देश-विदेशात गाजलेल्या बऱ्याच न्यायालयीन खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उत्तर-मध्य मुंबईसाठी उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र काँग्रेसच्या उमेदवार वरच्या गायकवाड यांनी त्यांचा थोड्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. भाजप सरकारने पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. कायदेशीर पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना संसदेमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न त्याद्वारे केंद्र सरकारने केल्याचे सांगितले जात असले, तरी भाजपच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने तो एक महत्वाचा पैलू मानला जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या खासदार रक्षा खडसे यांना यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनाही त्यांच्या कायदेविषयक अनुभवाचा विचार करून केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.ॲड निकम यांना कायदा मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण होऊ शकतो का ?
याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही मतदार संघांमध्ये सुद्धा दोन ते तीन मंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यानुसार ॲड. निकम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यास जळगाव जिल्ह्यास केंद्रात दोन आणि राज्यात तीन, असे तब्बल पाच मंत्री लाभू शकतील.
शपथविधी सोहळा लवकरच
दरम्यान ॲड उज्वल निकम यांचेसह चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झालेली असली तरी त्यांचा अजून शपथविधी सोहळा झालेला नसल्याने शपथविधी सोहळा झाल्यानंतरच मंत्रीपदाचा विचार केला जाऊ शकतो. अशी माहिती ॲड उज्वल निकम यांचे बंधू रोहित निकम यांनी दिलेली आहे.
जळगावात होणार भव्य नागरी सत्कार
ॲड उज्वल निकम यांची राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून त्यांचा जळगाव मध्ये सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून त्या समितीचे अध्यक्ष म्हणून जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांची नियुक्ती सर्वांना मते करण्यात आलेली आहे. तसेच जळगाव शहरातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.













