
भुसावळ ,दि-02/02/2026: भुसावळ नगरपरिषदेच्या सध्याच्या कार्यालयीन इमारतीला कामकाजासाठी अपुरी आणि सभागृहासाठी अपुरेशी असल्याचे कारण देत, पूर्वी हे दप्तर संत गाडगेबाबा रुग्णालयात हलविण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. या प्रस्तावाला प्रबळ विरोध झाला होता, विशेषतः भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले होते. या विरोधामुळे आणि प्रांत कार्यालयातील आंदोलनानंतर हा स्थलांतराचा मुद्दा रद्द करण्यात आला असल्याचे दिसून येते.
या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले अचानक दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यानंतर २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम हल्लीच्याच नगरपरिषद कार्यालयात पार पडला, ज्यामुळे स्थलांतराचा मुद्दा पूर्णपणे मागे पडल्याचे संकेत मिळाले.
मात्र आता सत्ताधारी गटात नवीन चर्चा सुरू झाली आहे. सध्याचे नगरपरिषद कार्यालय भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या संतोषी माता बहुद्देशीय सभागृहात हलविण्याच्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही सभागृहाची जागा काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर संबंधित संस्थेला विशिष्ट उद्देशाने दिली होती, असे सांगितले जाते. मात्र, भाडे कराराचा कालावधी संपला असल्याचेही सूत्रांनी सांगितले केले. या सभागृहाला नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. मात्र, या याचिकेचे आणि प्रकरणाचे पुढे काय झाले याचा अद्ययावत तपशील सध्या उपलब्ध होऊ शकला नाही.
स्थानिक राजकीय वर्तुळातून ही नवीन चर्चा बाहेर आल्याने शहरातील राजकीय गोटात यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.मात्र नगरपरिषदेच्या अधिकृत सूत्रांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.












