भुसावळ शहरात खून; एक जखमी, एका संशयिताला अटक, कौटुंबिक वादविवादाची पार्श्वभूमी !

भुसावळ, दि. 12 सप्टेंबर 2025: भुसावळ शहराला लागून असलेल्या आयान कॉलनीच्या शेवटच्या भागात आज शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पारिवारिक वादातून एका खुनाच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेत शेख समद कुरेशी (वय अंदाजे 40, रा. कंडारी, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारिवारिक वादातून ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि डीबी पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. फिर्याद नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.
या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकामार्फत सुरू आहे.












