कठोर इशारा: नायलॉन मांजा विक्री किंवा वापरल्यास थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’चा गुन्हा दाखल होणार – SP डॉ महेश्वर रेड्डी

जळगाव, दि. ८ जानेवारी २०२६ – आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाच्या विक्री आणि वापरावर कठोर कारवाईचा बिगुल फुंकला आहे. यावर्षी केवळ मांजाची जप्ती करण्यापुरती कारवाई न करता, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११० अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ असा गंभीर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केले आहेत.
नायलॉन मांजा हा मानवी जीवितासह पशुपक्ष्यांसाठी अत्यंत घातक असतो. गेल्या काही वर्षांत या मांजामुळे गळा कापल्याने अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. विक्रेता जाणीवपूर्वक नफ्यासाठी असा घातक मांजा विकत असल्याने, त्याचे कृत्य नवीन कायद्यानुसार ‘Attempt to Culpable Homicide’ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न)च्या व्याख्येत बसते. या गुन्ह्यात १० वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असून, तो अजामीनपात्र आहे.
पोलीसांची व्यापक मोहीम
पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या वतीने खास मोहीम राबवली जात आहे:
साध्या वेशातील विशेष पथके: प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष स्क्वॉड तयार करण्यात आल्या आहेत. ही पथके ग्राहक बनून दुकानांची गुप्त तपासणी करणार आहेत.
गोदामे आणि छुपे साठे: केवळ दुकानेच नव्हे, तर घर किंवा गोदामांमध्ये लपवून ठेवलेल्या मांजाच्या साठ्यांवरही धाडी टाकल्या जाईल.
विक्रेत्यांना नोटिसा: जिल्ह्यातील सर्व पतंग विक्रेत्यांना BNS आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कलम १४९ (BNSS १६८) अंतर्गत पूर्वनोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
लागू होणारे कायदेशीर कलमे
आरोपींवर खालील कलमांखाली थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत:
BNS कलम ११०: सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (१० वर्षांपर्यंत शिक्षा).
BNS कलम २२३: जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन.
पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५: ५ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपये दंड.
नागरिकांना आवाहन
नायलॉन मांजा तुटत नाही, त्यामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होऊ शकतात. शिवाय, विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. पालकांनी मुलांना असा मांजा घेऊन देऊ नये. सुरक्षित पर्याय म्हणून कापसी किंवा सूती मांजाच वापरावा.
परिसरात नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा दिसल्यास तात्काळ ११२ हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल.
संपर्क: पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव
फोन: ०२५७-२२२१७९० | फॅक्स: ०२५७-२२२०५११
ईमेल: sp.jalgaon@mahapolice.gov.in / pilcb.jalgaon@gmail.com
(जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव)













