राष्ट्रीय महामार्गावरील ट्रक आणि ट्रॉलाचा भीषण अपघात, तरीही चालकाचा जीव वाचवला; वरणगाव व महामार्ग पोलिसांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक
नशीब बलवत्तर, देव तारी त्याला कोण मारी !

भुसावळ, दि-12 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बोहर्डी गावाजवळील फौजी ढाब्याजवळ शुक्रवारी (दि.12) सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्राला यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र वरणगाव पोलीस, पाळधी महामार्ग पोलीस तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, धाडस आणि समन्वयामुळे चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्राला (क्रमाक एच आर 58 डी 0190) मुक्ताईनगरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने (क्रमाक आर जे 02 सी जी 7127) जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ट्रक चालक निजाम मोहम्मद (वय 30, रा. हलवाडा, राजस्थान) हा केबिनमध्ये गंभीररित्या अडकून पडला. अपघातानंतर काही काळ तो बाहेर निघू शकत नसल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस, पाळधी महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. चालक केबिनमध्ये लोखंडी पत्र्यांमध्ये अडकून पडल्याने त्याला बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. अखेर गॅस कटरच्या सहाय्याने ट्रकचा काही भाग कापून बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करत चालकाला सुखरूप बाहेर काढले.
चालकाला बाहेर काढल्यानंतर महामार्गावरील
कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या संपूर्ण बचाव मोहिमेत वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी भूषण माळी, गोपीचंद सोनवणे आणि सागर महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महामार्ग पोलीस विभागाचे कृष्णा पाटील, सलीम तडवी, सुनील साळुंखे, वसंत पाटील आणि संदीप पाटील यांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे गंभीर जखमी चालकाचा जीव वाचू शकला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पोलिसांच्या वेळीच मिळालेल्या मदतीमुळे आणि जीव धोक्यात घालून केलेल्या बचावकार्यमुळे वरणगाव शहरासह परिसरातून त्यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.













