शिंदेगटाच्या गायकवाडांवर पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या आमदार गणपत गायकवाडांना भाजपने उमेदवारी दिली का ?
मुंबई दिनांक-20/10/2024, भाजपने आज त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली असून मुंबई प्रदेशातील बहुतांश सिटिंग आमदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. अशातच मात्र धक्कादायक गोष्ट समोर आलेली असून या सगळ्यात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेवरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तसेच गदारोळही झालेला होता.
शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कल्याण मध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. विशेष म्हणजे पाच गोळ्या लागूनही महेश गायकवाड हे जिवंत सुखरूप आहेत. गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत. दोन दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी महायुतीला इशारा दिला होता. भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे महेश गायकवाड यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर महेश गायकवाड काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजप शिंदे गटातील कार्यकर्ते या ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले असून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाची यादी आल्यानंतर याबाबत स्पष्टता समोर येणार आहे. या हायव्होल्टेजला लढतीकडे राज्याचे लक्ष लागू आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यावर आता काय निर्णय घेतात, याकडे भाजप सह शिंदे गटाच्या नजरा लागून आहेत.