जळगाव
Trending

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात भुसावळ रेल्वे प्रबंधकांची बैठक, नेमकं काय घडलं

जळगाव, दि.२२ सप्टेंबर, रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकवर आत्महत्या सारख्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केल्या.
रेल्वे परिसरात होणाऱ्या आत्महत्येवर करावयाच्या उपाययोजनासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधक व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते‌. या‌ बैठकीला मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय ,आमदार सुरेश भोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, विभागीय परिचालन प्रबंधक योगेश पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंग करतांना तसेच रेल्वेच्या क्षेत्रात आत्महत्येच्या घटना‌ नियमित घडत असतात. या घटनांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी रेल्वे प्रशासनाने आत्महत्या प्रवण क्षेत्रांचा शोध घेऊन त्याठिकाणी कंपाउंड वॉलचे बांधकाम करावे. सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रेल्वे पोलीसांची दैनंदिन गस्त वाढविण्यात यावी. महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त विद्यमाने आत्महत्येपासून परावृत करण्यासाठी समूपदेशन शिबिरांचे आयोजन करावे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती करावी.

रेल्वे व आरोग्य प्रशासनाने हेल्पलाईन प्रसिद्ध करावी. हेल्पलाईन क्रमांक सर्वसामान्यांना ठळकपणे दिसून येईल. अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावा. अशा सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

रेल्वे व्यवस्थापक श्रीमती पाण्डेय म्हणाल्या, रेल्वे प्रशासनाने आत्महत्या प्रवण क्षेत्रांचा शोध घेतला आहे. याविषयावर रेल्वे व जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

आमदार सुरेश भोळे म्हणाले की, जळगाव -शिरसोली सेक्शन मध्ये प्रभू देसाई नगर,बजरंग बोगदा, गणेश कॉलनी, प्रेम नगर, प्रिंप्राला, खंडेराव नगर, शिव कॉलनी, आशाबाबा नगर, हरिविठ्ठाल नगर हे भागात आत्महत्या व इतर रेल्वे अपघाताच्या घटना नियमित घडत असतात. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
हेल्पलाईन जाहीर

या बैठकीत आरोग्य प्रशासनाने नागरिकांच्या समूपदेशनासाठी हेल्पलाईन जाहीर केली. व्यसन , परीक्षेचा ताण, आंतर वैयक्तिक समस्या, बेचैनी , घबराहट, उदासिनता, आत्महत्येचा विचार यांसारख्या समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक १४४१६/१८००-८९१४४१६ वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button