Advertisement
अर्थकारणजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्रातील पहिले लोकप्रतिनिधी ! गिरीश महाजन यांनी वर्षभराचे ३१ लाखांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दान केले

मुंबई, दि. ०७ ऑक्टोबर २०२५: राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत आपल्या वर्षभराच्या वेतनाची रक्कम, म्हणजेच ३१ लाख १८ हजार २८६ रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीस दान केली आहे. अशा प्रकारे संपूर्ण वेतन दान करणारे ते महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मंत्री ठरले आहेत. आज, मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान त्यांनी यासंबंधीचा धनादेश आणि संमतीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
राज्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे शेतीसह अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य केले जाते. मंत्री गिरीश महाजन यांनी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे महाजन यांनी या दानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
“राज्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मी स्वत: अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्य शासन जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या मदतकार्यात माझाही सहभाग असावा, या हेतूने मी माझ्या मंत्रिपदाच्या डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीच्या संपूर्ण वेतनाची रक्कम, म्हणजेच ३१ लाख १८ हजार २८६ रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीस दान करत आहे,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ, आग यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिकांना अर्थसहाय्य पुरवले जाते. यापूर्वी अनेक सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या निधीला योगदान दिले आहे. मात्र, संपूर्ण वर्षभराचे वेतन दान करणारे गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील पहिले मंत्री ठरले आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button