यावल येथील आगार रक्षकावर एसीबीची धडक कारवाई; १० हजारांची मागणी, तडजोडीनंतर १ हजारांवर सौदा,वनरक्षकावर लाचमागणीचा गुन्हा दाखल;

जळगाव, ३० मार्च २०२६ :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), जळगाव यांनी वन विभागातील एका वनरक्षकाविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करत महत्त्वाची कारवाई केली आहे. यावल येथील आगार रक्षक भैयासाहेब भिमराव गायकवाड (वय ४३) यांनी लाकूड वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, सापळा कारवाईदरम्यान संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारणे टाळले. मात्र, लाच मागणीचा ठोस पुरावा मिळाल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार रेष्मा चंद्रकांत अवतारे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ तक्रारदार हे लाकूड वाहतूकदार असून दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे अंजाळे, पाडळसे व परिसरात लाकूड वाहतूक व्यवसाय करतात. त्यांच्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी गायकवाड यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १ हजारांवर आली.
याबाबत तक्रारदारांनी २० मार्च २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. पंचांसमक्ष आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्याच्या वेळी आरोपीला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. तरीही मागणीचा पुरावा उपलब्ध असल्याने फ्रेंजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत १,०४० रुपये रोख रक्कम तसेच सुमारे १.१० लाख रुपये किंमतीचा सॅमसंग अल्ट्रा २५ मोबाईल व एक आयटेल कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. या मोबाईलची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी परीक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले, तर पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी सापळा अधिकारी म्हणून कारवाईचे नेतृत्व केले. पोहेकॉ बाळू मराठे, पोर्को राकेश दुसाने आणि सुरेश पाटील यांनी पथकात सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनिल दोरो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास तत्काळ तक्रार करावी. यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार असून, जळगाव येथील कार्यालयाशीही थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.












