जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

रोहिणी खडसेंना भाजपची मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी ? दिल्लीत हालचाली ? लवकरच देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ?

आमदार चंद्रकांत पाटलांची शंका खरी ठरणार ?

जळगाव- दिनांक-२८ जून, गेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या फरकाने भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. यातच रावेरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असलेले श्रीराम दयाराम पाटील यांचा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी तब्बल दोन लाख 72 हजार मतांनी पराभव केला आहे. सुरुवातीला रक्षा खडसेंच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे-खेवलकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राहणार असल्याची थोडीशी शक्यता काहींना वाटत होती. मात्र जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते सतीश अण्णा पाटील यांनी याबाबत तेव्हाच अशी लढत होणार नसल्याची शक्यता वर्तविलेली होती. तसेच एकनाथराव खडसे हे त्यांच्या कुटुंबियांच्या सोयीचं राजकारण करतात असा आरोप त्यावेळी सतीश अण्णा पाटलांनी जाहीर पणे केलेला होता. त्यानंतर भुसावळच्या जाहीर सभेत शरद पवार यांचे समोर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनीही खडसे कुटुंबियांचा विषय कायमचा संपवा त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नुकसान झाल्याचे वक्तव्य केलेलं होतं. दरम्यान पुढे नेमके तसेच झालेलं आहे. रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आधीच साफ नकार दिलेला होता. तसेच रोहिणी खडसेंना मुंबईत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की “रक्षा खडसेंनी खासदार म्हणून गेल्या दहा वर्षात रावेर मतदार संघाचा विकास केला का ? एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटते ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी माध्यमांना देताना “तुम्ही माझ्या मतदारसंघात या ,मी तुम्हाला तिथे त्याचे उत्तर देते ” असे सांगून वेळ मारून उत्तर देण्याचे टाळले होते. तिथेच शंकेची पाल चुकचुकली होती. त्या प्रश्नाचे उत्तर मिडियाला अजूनही मिळालेले नाही. त्यानंतर मुक्ताईनगर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सभेत रोहिणी खडसे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून तब्बल एक लाखाचे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर वक्तव्य केलेले होते. मात्र तो दावा फोल ठरला आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या भावजयी रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४६ हजार ९२९ मतांचा लीड मिळालेला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मतदानासाठी केलेल्या पक्षकार्यावर पक्षातल्या काही कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित करण्यात येऊन टीका करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे खडसे परिवाराचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंचा उघडपणे प्रचार केलेला नव्हता. तसेच प्रचारात सक्रिय सहभाग देखील दर्शविला नव्हता.मात्र शेवटच्या क्षणी रक्षा खडसेंनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली होती. आता परवा जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात जळगाव जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आलेली आहे. मात्र रोहिणी खडसे या महिला प्रदेशाध्यक्ष असल्याने त्या पदावर कायम आहेत. मात्र त्या आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पुढील महिन्यात रामराम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.
एकनाथराव खडसेंसह भाजप प्रवेश ?
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते असलेले आमदार एकनाथराव खडसे यांनी ते आता भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा छुप्या पद्धतीने उघड प्रचार केलेला होता. आणि त्या विजयी सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे एकनाथराव खडसे यांचे भाजप पक्षश्रेष्ठींच्या दिल्ली दरबारी वजन नक्कीच वाढलेले आहे. परंतु काही पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही रोखून धरलेला आहे. त्यातच एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना आता केंद्रात क्रिडा राज्यमंत्रीपद मिळाल्याने एकनाथराव खडसे यांचे दिल्ली दरबारी अजून मोठे वजन वाढलेलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,जे. पी. नड्डा यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. याच भेटीत त्यांनी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनाही भाजपात घेऊन मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी मिळण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आलेली आहे.
आता पुढील येत्या काही दिवसांत रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांचे वडील आमदार एकनाथराव खडसे यांचेसह दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. रोहिणी खडसे यांचा भाजप प्रवेश झाल्यास मुक्ताईनगर विधानसभेची जागा ही भाजपच्या तिकिटावर रोहिणी खडसे याच लढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशी रोहिणी खडसेंच्या विजयाची ‘गॅरंटी’ एकनाथराव खडसेंनी भाजप पक्षश्रेष्ठींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला मिळालेले ४६ हजार ९२९ मतांचे मताधिक्य हे रोहिणी खडसेंनी विधानसभेसाठी केलेली चाचपणी होती का ? अशी चर्चा आता सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची समीक्षा करण्यात आलेली होती. त्यानंतर येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी गुप्त व्यूव्हरचना आणि रणनीती आखण्यात आलेली असून ऐनवेळी महायुती दुभंगल्यास आणि त्यानंतर भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरविल्यास मुक्ताईनगर विधानसभेचे भाजपचे टिकिट हे रोहिणी खडसे यांनाच मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास त्यांचे विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणारे विद्यमान अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात काय-काय धक्कादायक राजकीय घडामोडी घडतात, याकडे जळगाव जिल्ह्यासह मुक्ताईनगर विधानसभेतील नागरिकांचे लक्ष लागून आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button