वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश : भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी ४.७३ कोटींचा निधी मंजूर
भुसावळ शहराच्या वाढत्या विस्तारानुसार नियोजन

भुसावळ दि-२६/०६/२५,भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेच्या विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून एकूण ४ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही मंजुरी वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे शक्य झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
१५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध नागरी स्वराज्य संस्थांसाठी ही योजना राबवली जात आहे. नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार दिनांक १९ जून २०२५ रोजी अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आला असून त्यामध्ये भुसावळ नगरपरिषदेसाठी तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मंजूर केलेल्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे –
- नवीन अग्निशमन केंद्र उभारणीसाठी ₹२ कोटींचा निधी
– भुसावळ शहरात नव्याने दोन बेमधील अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. वाढत्या नागरी गरजांनुसार ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. - अग्निशमन टेंडर व बचाव उपकरणांसह गाडी खरेदीसाठी ₹२.२३ कोटी निधी
– अत्याधुनिक फायर फायटिंग टेंडर, रेस्क्यू उपकरणे यांचा समावेश असलेली ही गाडी शहराच्या आपत्कालीन सेवेची गुणवत्ता वाढवणार आहे. - आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘सर्च अँड रेस्क्यू टूल्स’ किटसाठी ₹५० लाख
– या किटचा उपयोग आग, दुर्घटना व अन्य आपत्ती काळात जलद आणि प्रभावी मदतीसाठी होणार आहे.
ही योजना राबवण्यासाठी केंद्र व राज्य यांच्यात ७५:२५ अशा प्रमाणात निधी वाटप करण्यात आले असून, शासनस्तरावरून या योजनेची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
सदर निधीसाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सतत पाठपुरावा करून संबंधित विभागांकडे जोरदार पाठराखण केली. त्यामुळेच ही योजना मंजूर होऊन भुसावळ नगरपरिषदेला दिलासा मिळाला आहे.
भुसावळ शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही योजना ऐतिहासिक ठरणार असून, नागरी सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.













