दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांची तडकाफडकी बदली, नाशिकच्या ‘नियंत्रण कक्षात’ जमा ! राखेतील भ्रष्टाचार व वाढत्या प्रदूषणाच्या गैरव्यवस्थापनाचा ठपका
मीडियामेल न्यूजच्या दणक्याने दिपनगर प्रशासन हादरले

भुसावळ दि-01/06/2025, भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या नाकर्तेपणामुळे या प्रकल्पातून गेल्या सहा महिन्यांपासून राखेचे धुलिकण मोठ्या प्रमाणावर सभोवतालच्या 10ते 15 किमी परिसरातील हवेत मिसळून प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडलेली होती. भुसावळ तालुक्यातील वाढत्या धोकादायक प्रदूषणाला आणि तापमान वाढीला मुख्य अभियंतांचे गैरव्यवस्थापन कारणीभूत होते. त्यांचा त्यांच्या विविध विभागांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कुठलाच वचक नव्हता. तसेच प्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया सुद्धा जलप्रदूषणास कारणीभूत ठरलेली होती. याबाबत नाशिक विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला प्रकल्प बंद का करण्यात येऊ नये ? अशा आशयाची अनुपालन नोटीस सुद्धा जानेवारी आणि मार्च महिन्यात बजावलेली होती.
दिपनगर प्रकल्पाचे मुख्य अभियंता राखेमध्ये भ्रष्टाचार करताहेत !! त्यांची लवकरच बैठक लावून दोषी आढळल्यास कारवाई करू- पालकमंत्री गुलाबराव पाटील https://mediamail.in/दिपनगर-प्रकल्पाचे-मुख्य
याबाबत mediamail.in न्यूज ने भुसावळ तालुक्यातील वाढत्या धोकादायक प्रदूषणाचे मुद्दे व दुष्परिणाम याबाबतचे वृत्त सातत्याने पुरावानिशी प्रकाशित केलेले होते. सदरील बातम्या या मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे , जलसंपदामंत्री गिरीषजी महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे आणि राज्याचे मुख्य सचिव आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना टॅग करण्यात आल्या होत्या तर काहींना व्हाट्सअप वरती पाठविण्यात आलेल्या होत्या. त्या गंभीर परिणामकारक वृत्ताच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्याची दखल घेऊन संताप व्यक्त करत मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावून चौकशी करण्याचे जाहीर केले होते. मात्र ही चौकशी झाली असती तर, दीपनगरच्या राखेतील गैरव्यवहारांचे गौडबंगाल समोर आले असते, यामध्ये काही झारीतील शुक्राचार्य असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला असता ? म्हणून, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बैठक होऊच नये म्हणून खोडा घातल्याने ती बैठक वारंवार लांबणीवर पडत होती. मात्र येत्या 20 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच मुख्य अभियंतांच्या बदलीसाठी वरीष्ठ स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते. विशेष म्हणजे मीडियामेल न्यूजच्या वृत्ताच्या हवाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्यावर राखेच्या गैरव्यवहाराबाबतचे ताशेरे देखील ओढलेले होते.
विभागीय कार्यालयात होणार चौकशी ?
प्रफुल्ल भदाणे यांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी पदभार घेतला होता. दिनांक 30 मे रोजी अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची वाढत्या प्रदूषणाच्या गैरवस्थापनाचा ठपका ठेवून उचलबांगडी करून मुख्यालय सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आता त्यांची नाशिक विभागीय कार्यालयातील सीपीए विभागात बदली झाली आहे. त्या ठिकाणी त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत राखेतील भ्रष्टाचार, सांडपाण्याचे गैरव्यवस्थापनावर झालेला खर्च यांसह विविध दाखल तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या रिक्त जागी आता नाशिक औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांची बदली असून ते सोमवारी पदभार स्विकारणार आहेत.
प्रदूषणाचा विळखा कायम !
भ्रष्ट अधिकाऱ्याची बदली झालेली असली तरी येणाऱ्या नवीन मुख्य अभियंत्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना शिस्त लावणे बंधनकारक असून राख माफीयांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन रुजू होणाऱ्या मुख्य अभियंतांमुळे आता राख माफियांमध्ये खळबळ उडालेली असून हप्ते खाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सन्नाटा पसरल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे नवीन मुख्य अभियंता आता या प्रकल्पाच्या व्यवस्थापनात कशी सुधारणा घडवून आणतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.













