Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भुसावळात स्वस्त धान्य दुकानांची ३ वर्षांपासून तपासणीच नाही ! काळाबाजार रोखण्याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही दक्षता समितीची नियुक्ती नाही

भुसावळ दि-13/06/2025, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणा-या अन्नधान्याचे वितरण कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराशिवाय किंवा गैरव्यवहाराशिवाय शिधापत्रिकाधारकांना नियमितपणे व पुरेशा प्रमाणांत उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासन निर्णय व परिपत्रकान्वये क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी रास्त भाव दुकानांची तपासणी मानके निश्चित करण्यांत आली आहेत. त्यानुसार तहसीलदार यांना त्यांच्या तालुक्यातील दरमहा किमान स्वयंनियमित ६ तर पुनर्विलोकन ५ तपासण्या अशा एकूण ११ मासिक तपासण्या करणे शासनाने बंधनकारक केले आहे. तर पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांना दरमहा १० दुकानांची तपासणीचा इष्टांक दिलेला असून तो बंधनकारक आहे. असे असतानाही भुसावळ शहरासह तालुक्यात वर्ष जानेवारी 2022 पासून मे 2025 पर्यंत कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली गेली नसल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उघडकीस आलेले आहे. त्यामुळे पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांनी दुकानांची तपासणी का केली नाही ? तपासणी न करताच स्वस्त धान्य दुकानांचा भ्रष्टाचार नेमका कसा रोखला जाईल ? हे शासकीय कर्तव्यात कसूर नाही का ? हा गरिबांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्यातील भ्रष्टाचाराला हेतूपूर्वक पाठिंबा आहे का ? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. तसेच सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवणे बंधनकारक असताना, बहुतांश दुकानदार ग्राहकांना त्यांची दुकानदारांसदर्भातील तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार पुस्तिकाच उपलब्ध करून देत नाही, तसेच दक्षता समिती सदस्यांच्या नियुक्तीची यादी उपलब्ध नसून व अनेक दुकानदार तक्रार निवारण क्रमांक दर्शनी भागात लिहित नाही , तसेच प्रत्येक ग्राहकाला त्यांनी घेतलेल्या धान्याची पावती देणे बंधनकारक असताना, ती सुद्धा काही दुकानांमधून दिली जात नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दक्षता समितीची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले असतानाही अजूनही दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली नाही. भुसावळ तालुक्यात 129 तर भुसावळ शहरात एकूण 66 स्वस्त धान्य दुकाने आहेत. मात्र रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाची यंत्रणा हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
पुरवठा विभागाची यंत्रणा स्वतंत्र – तहसीलदार
याप्रकरणी भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, स्वस्त धान्याच्या दुकानांवर तपासणी आणि निरीक्षणे करण्याचे काम हे पुरवठा विभागाचे असून त्यांच्याकडे यासाठी स्वतंत्रपणे पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त माझ्याकडे एखाद्या दुकाना संदर्भात ग्राहकांची तक्रार आल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाते.
अधिकाऱ्यांना इष्टांकानुसार तपासणी बंधनकारक – रूपेश बिजेवार ,जिल्हा पुरवठा अधिकारी
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जळगाव जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश बिजेवार यांची यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार तहसीलदार ,पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांना स्वस्त धान्य दुकानांची दरमहा तपासणी करण्यासाठी शासनाकडू स्वतंत्रपणे वेगवेगळे ईष्टांक दिलेले असून त्यानुसार त्यांनी स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर आमच्याकडे पुरवठा निरीक्षक यांच्यासंदर्भात तक्रार आल्यास आम्ही तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवतो. तसेच एखाद्या दुकानांची रितसर तक्रार आल्यास सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून नियम ,अटी व शर्तींचे उल्लंघन संबंधित दुकानदाराकडून झालेले आढळून आल्यास त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button