Advertisement
क्राईम/कोर्टजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

प्रांजल खेवलकर प्रकरणात पुरावा छेडछाडीचा पोलिसांचा आरोप, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

जळगाव ,२७ ऑगस्ट २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या पोलिसांच्या गंभीर आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज संयमी प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे यांनी आज म्हटलेलं आहे की, मी नेहमी दिल्लीत असते, आणि आजच घरी आलेली असून, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून ,याबाबत मी कोणत्याही प्रकारची टिप्पणी करणार नाही. पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य असून, सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करणे योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी...

पुण्यातील खराडी भागात २५ जुलै रोजी झालेल्या एका कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या घटनेत डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर NDPS कायदा, POCSO कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी खेवलकर यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले होते. तपासादरम्यान, एका मोबाईलमधील सिम कार्ड ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, खेवलकर अटकेत असताना सोनारने हे सिम हरवल्याचा दावा करून नवीन सिम घेतले आणि त्यात व्हॉट्सअॅप डेटा डिलीट केला. हा प्रकार पुरावे नष्ट करण्याचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यात रोहिणी खडसे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, पोलिसांनी त्यांना सहआरोपी करण्याची शक्यता बोलली आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून, या प्रकरणात त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रकरणात आणखी एक वळण आले आहे. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये एका महिलेच्या विवस्त्र अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ सापडल्याने सायबर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राज्य महिला आयोगानेही हस्तक्षेप केला असून, मानवी तस्करी आणि महिलांचा अश्लील वापर झाल्याचे आरोप केले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून विशेष तपास पथक (SIT) ने चौकशी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button